चौकशी करायचीच असेल तर ड्रग्ज माफियांची करा, मला का धमकावताय?, सुषमा अंधारे यांचा सवाल
By आनंद डेकाटे | Published: October 19, 2023 01:33 PM2023-10-19T13:33:33+5:302023-10-19T13:38:50+5:30
माफी तर सोडा एक शब्दही मागे घेणार नाही
नागपूर : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन पुन्हा एकदा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह गृहमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. शंभूराज देसाई म्हणाले माफी मागा नाहीतर.... त्यांच्या "नाही तर" या शब्दाचा अर्थ काय? मला धमकी देत आहे का?". गृहमंत्री फडणवीस म्हणाले, बोलणाऱ्यांची तोंडे बंद होतील. ही धमकी समजायची का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. चौकशी करायचीच असेल तर ड्रग्ज माफियांची करा, मला का धमकावताय ? मी चळवळीतून आलेली आहे. कुणाला घाबरणारी नाही. माफी तर सोडा एक शब्दही मागे घेणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गुरुवारी त्या नागपुरात पत्रकारांशी बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, शंभूराज देसाईंसोबत माझं वैयक्तिक वैर नाही. त्यांच्या खात्याशी संबंधित जर विषय असेल तर त्यांनाच विचारणार. राज्याचं उत्पादन शुल्क खातं शंभूराज देसाईंकडे आहे. तो विभाग सपशेल अपयशी आहे. मी जे काल बोलले, त्यामधून मी एक ही शब्द मागे घेणार नाही. माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही, ललित पाटील प्रकरणावरुन सुषमा अंधारेंनी दादा भुसे आणि शंभूराज देसाईंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. शंभूराज देसाई हे उत्पादन शुल्क मंत्री आहेत, त्यांची एक नाही तर असंख्य प्रकरणं बाहेर येत आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावर सुषमा अंधारे यांनी आजही आपण वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं.
अंधारे म्हणाल्या, ललीत पाटील पोलिसांच्या स्वाधीन झाला मी पळालो नव्हतो, मला पळवून लावलं असं त्याच म्हणणे आहे. मी स्वतः शिक्षिका आहे, मला विद्यार्थ्यांची चिंता आहे.पुणे हे शिक्षेचे माहेरघर आहे. म्हणून मी पुण्याचा उडता पंजाब होऊ नये म्हणून हे मुद्दे उपस्थित करत आहे. ससून रुग्णालयाच्या गेटवर दोन कोटींचे ड्रग्ज मिळत असेल तर हे चिंताजनक नाही का? कोर्ट परिसरात चरस मिळाले हे गंभीर नाही का? नाशिकमध्ये कोट्यवधींचा ड्रग्जचा कारखाना मिळाला, याचे तुम्हाला काहीही वाटत नाही का? असे सवाल सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाईंना विचारले. ललित पाटील पळून गेल्याच्या प्रकरणात जे कोणी पोलीस, स्कूल वाले, वाहन चालक सहभागी आहे त्या सर्वांची नार्को चाचणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
- या प्रश्नांची मागितली उत्तरे
संभाजीनगरमधील ज्या कंपनीने राज्याचे १४३ कोटींचे महसूल बुडवले, त्या कंपनीची हियरींग तुम्ही तुमच्या दालनात बोलावली. काय कारण होते? पुण्याचे एक्साईजचे अधिकारी चरणसिंग राजपूत यांनी बंद केलेली ताडी पुन्हा सुरू केली. का सुरू केली? याच राजपूतने अनेक दुकानदार मोफत दारू प्यायला देत नाही म्हणून मारहाण केली आहे.याच राजपूतने खोटे जात प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळविली. त्याचा इतका लाड का? प्रदीप शर्मा त्याच बराकीत आहे, ज्यात ललित पाटील होता. १० महिने त्याच्यावर उपचार चालले. असे कोणते आजार झाले यांना?
- अन् सुषमा अंधारे भावनिक झाल्या
सुषमा अंधारे म्हणाल्या, हे विषय मी एकटीच बोलली असे नाहीय यापूर्वी विविध पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेच्या दोन्ही सभागृहात हे विषय मांडले आहेत. मी बोलले म्हणून मला धमकावत आहेत. कारण मी गरीब आहे. अनिल देशमुख, नवाब मलीक यांच्यासारखे मला अडकवाल ? काही सापडणार नाही. धमक्या येताहेत. काल माझ्या भावाचा अपघात झाला. घरी एक लहान मुलगा आहे, असे सांगत त्या भावनिक झाल्या. त्यांचे डोळेही पाणावलेस्स्वत:ला सावरत मी चळवळीतून आलेली आहे. कुणाला घाबरत नाही. घाबरणारही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.