नागपूरच्या इमामवाड्यातील तरुणाचा अकोला जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:58 PM2019-04-12T22:58:03+5:302019-04-12T22:59:23+5:30
अचानक बेपत्ता झालेल्या ईमामवाड्यातील तरुणाचा बाळापूर (जि. अकोला) जवळ पाण्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह सरळ इमामवाडा पोलीस ठाण्यात नेला. या घटनेमुळे इमामवाडा ठाण्यासमोर गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अचानक बेपत्ता झालेल्या ईमामवाड्यातील तरुणाचा बाळापूर (जि. अकोला) जवळ पाण्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह सरळ इमामवाडा पोलीस ठाण्यात नेला. या घटनेमुळे इमामवाडा ठाण्यासमोर गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते.
गौरव विनोद गाडवे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव असून तो इमामवाड्यात राहत होता. पत्नी सोडून निघून गेल्याने तो हवालदिल झाला होता. अशात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याने विमनस्क अवस्थेत तो मंगळवारी,७ एप्रिलला तो घरून निघून गेला. त्याचा ईकडे तिकडे शोध घेतल्यानंतर त्याच्या पालकांनी इमामवाडा पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी मिसिंगची नोंद करून त्याचा शोध सुरू केला. बुधवारी, १० एप्रिलला त्याच्या आईला शेगाव पोलीस ठाण्यातून फोन आला. शेगावमधील नागरिकांशी वाद घातल्याने संतप्त जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केले. चौकशीत तो वेडसरसारखा वागत असल्याने त्याच्याकडून तुमचा संपर्क क्रमांक मिळवून तुम्हाला फोन केला,असे त्यावेळी शेगाव पोलिसांनी गौरवची आई रेखा यांना सांगितल्याचे समजते. यावेळी गौरवने त्याच्या आईसोबत बोलताना तिला शेगावला घ्यायला येण्यास सांगितले होते. त्यामुळे गौरवचे आईवडील शेगावला जाण्यास निघाले. गुरुवारी ११ एप्रिलला सकाळी ते शेगावला पोहचले. त्यावेळी आम्ही गौरवला सोडून दिल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे त्या नागपूरकडे परत येण्यास निघाल्या. वाटेत असताना त्यांच्या मोबाईलवर बाळापूर पोलिसांचा फोन आला. त्यामुळे त्या तिकडे गेल्या आणि त्यांना गौरवचा मृतदेहच पाहायला मिळाला.
बाळापूर (अकोला) पोलिसांनी गौरवचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे गाडवे कुटुंबीयांना कळविले. रात्री उशिरात गौरव गाडवेचा मृतदेह घेऊन ते इमामवाडा ठाण्यासमोर धडकले. गौरवच्या मृत्यूला पोलिसांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप करून त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आक्रोश सुरू केला. वर्दळीच्या मार्गावर पोलीस ठाणे असल्याने अल्पावधीतच वस्तीतील मंडळींसह रस्त्याने जाणारे-येणारेही तेथे गोळा झाले. काहींनी नारेबाजी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. पीएसआय अमोल जाधव आणि त्यांच्या सहका-यांनी संतप्त जमावाची समजूत काढली. ही घटना बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने इमामवाडा पोलिसांचा त्यासोबत काही संबंध नसल्याचे समजावून सांगितले. त्यामुळे मध्यरात्री तणाव निवळला.
शेगाव पोलिसांचा हलगर्जीपणा
गौरवच्या संशयास्पद मृत्यूला शेगाव पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप गौरवची आई रेखा हिने केला आहे. ज्यावेळी त्यांना शेगाव पोलिसांचा फोन आला त्यावेळी आई रेखा यांनी पोलिसांना गौरवला तुमच्या ताब्यात ठेवा, आम्ही घ्यायला येतो, असे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी त्याला कसे काय सोडून दिले, हा संशयाचा मुद्दा ठरला आहे. तो बाळापूरला कसा पोहचला, तेथे तो पाण्यात बुडून कसा मेला, हे सर्व प्रश्न संशय वाढवणारे आहेत. त्यामुळे विमनस्क अवस्थेतील गौरवला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली असावी आणि त्याचा मृतदेह पाण्यात फेकून देण्यात आला असावा, असा संशय रेखा यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गौरवच्या खिशात नागपूरच्या परतीचे तिकीट आढळल्याने हे प्रकरण जास्तच संशयास्पद झाले आहे.