नागपूरातील इतवारी भागात नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:08 AM2018-06-26T01:08:25+5:302018-06-26T01:09:38+5:30
इतवारीतील मस्कासाथ परिसरात एका नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. शांतिनगर पोलिसांनी या प्रकरणात संदिग्ध भूमिका वठविल्याने नवविवाहितेच्या कुटुंबीयांमध्ये रोष पसरला आहे. मृतदेहासह शांतिनगर पोलीस ठाण्यास घेराव करण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांना अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर ते शांत झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारीतील मस्कासाथ परिसरात एका नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. शांतिनगर पोलिसांनी या प्रकरणात संदिग्ध भूमिका वठविल्याने नवविवाहितेच्या कुटुंबीयांमध्ये रोष पसरला आहे. मृतदेहासह शांतिनगर पोलीस ठाण्यास घेराव करण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांना अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर ते शांत झाले. सारिका स्वप्निल जैन (३४) रा. तेलीपुरा पेवठा असे मृताचे नाव आहे.
सारिकाचे पती मस्कासाथ तेलीपुरा येथील स्वप्निल जैन आहेत. ते गारमेंट व्यापारी आहेत. सारिकाच्या परिवारात आई-वडील, दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. तिचे भाऊही गारमेंट व्यापारी आहेत. सारिकाचे तीन वर्षांपूर्वी स्वप्निलसोबत लग्न झाले होते. कुटुंबीयानुसार लग्न झाल्यापासूनच सारिकाला त्रास दिला जात होता. सारिकाने बीएड केले होते. सारिकाच्या कुटुंबीयांनी सारिकाला घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्याचा सल्लाही दिला होता. परंतु सारिकाला ते मान्य नव्हते. सारिकाला स्वयंपाकखोलीतही जाऊ दिले जात नव्हते. दोन वर्षांपूर्वी आजारी पडल्याने तिला माहेरी सोडण्यात आले. आई-वडिलांनीच उपचाराचा खर्च केला. ती पाच महिने माहेरी राहिली, परंतु कुणीही तिची विचारपूस करायला आले नाही. वर्षभरापूर्वी सारिकाच्या भावाचे लग्न झाले. लग्नाला सारिकाला जाऊ दिले, परंतु सासरचे कुणीही आले नाही. सारिकाचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील सिलवावी येथील राहणारे आहे. नुकतेच ते येथे आले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी तिचा भाऊ गावावरून तिला भेटायला आला होता. परंतु त्यालाही तिची भेट घेऊ देण्यात आली नाही. सारिका अतिशय धार्मिक प्रवृत्तीची होती. तिला मंदिरातही जाऊ दिले जात नव्हते.
तिच्या कुटुंबीयानुसार सोमवारी सकाळी ६ वाजता स्वप्निलने सारिकाने आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्याने सांगितले की, रविवारी रात्री टीव्ही पाहत तो बेडरुमच्या बाहेरच झोपला. रात्री २.३० वाजता झोप उघडल्यावर सारिका सिलिंग फॅनला फासावर लटकली होती. तो तिला खासगी डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरने तिला मृत घोषित केले. मृत घोषित केल्याने तो मेयो रुग्णालयात गेला. दुपारी मेयो रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान सारिकाच्या कुटुंबीयांनी शांतिनगर पोलिसांना मृतदेह दाखविण्याची विनंती केली.
परंतु पोलीस मृतदेह दाखवण्यास टाळाटाळ करीत होते. शवविच्छेदनानंतर सायंकाळी ५.३० वाजता कुटुंबीय मृतदेहासह लाकडीपूल येथील सारिकाच्या आई-वडिलांच्या घरी गेले. तिथे सारिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसून आल्या. तिला बेल्टने मारहाण केल्याचे आढळून येत होते. तेव्हा संतप्त कुटुंबीयांनी मृतदेहासह शांतिनगर पोलीस ठाण्याला घेराव करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी झोन ३ चे डीसीपी राहुल माकणीकर यांना शांतिनगर पोलिसांच्या भूमिकेबाबत सांगितले. माकणीकर यांनी लगेच एसीपी वालचंद्र मुंडे यांना सारिकाच्या घरी पाठविले. कुटुंबीयांनी मुंडे यांना जखमांच्या खुणा दाखविल्या. मुंडे यांनी निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तयार झाले.
सारिकाचे वडील संतोषकुमार जैन यांनी मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, सारिका आत्महत्या करूच शकत नाही. स्वप्निल आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीची हत्या केली. पती स्वप्निल आणि त्याच्या कुटुंबीयांनी सारिकाच्या भावाला धमकावीत त्याच्या बहिणीला मारेन, असे म्हटले होते. याचे रेकॉर्डिंगही त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. सारिकाने आठ महिन्यांपूर्वीसुद्धा तिला त्रास दिला जात असल्याचे सांगितले होते. शांतिनगर पोलीस मात्र सारिकाने आत्महत्या केल्याचे सांगत आहेत.