नागपूर मध्यवर्ती कारागृहात तरुण कैद्याचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 10:11 AM2022-05-16T10:11:26+5:302022-05-16T10:17:46+5:30
कारागृहात त्याला मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला.
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एका तरुण कैद्याचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत जबाबदार व्यक्तींवर कारवाई होत नाही तोपर्यंत शव घेणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने मेडिकल परिसरात तणाव निर्माण झाला होता.
नंदनवन येथील श्रीनगर रहिवासी आकाश ताराचंद घोड (वय २८) हा मागील काही कालावधीपासून हत्येच्या आरोपाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कोठडीत होता. शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली व त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्याचे शव पाठविण्यात आले. रविवारी सकाळपासूनच त्याच्या नातेवाईकांनी मेडिकलमध्ये गर्दी केली होती.
कारागृहात त्याला मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला. त्याला अटक झाली होती तेव्हादेखील पोलीस ठाण्यात बेदम मारहाण करण्यात आली होती व जबरदस्तीने त्याच्याकडून कबुलीजबाब लिहून घेतला होता, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला. जोपर्यंत जबाबदार व्यक्तींवर कारवाई होत नाही तोपर्यंत त्याचे शव स्वीकारणार नसल्याची भूमिका त्याच्या नातेवाईकांनी घेतली. अखेर उपायुक्त नुरूल हसल हे स्वत: मेडिकलमध्ये गेले व त्याच्या नातेवाईकांची समजूत घातली. शवविच्छेदनाच्या अहवालात जर त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा मिळाल्या तर निश्चितच पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
इतरही चार कैद्यांना मारहाण
दरम्यान, मृतक आकाशसह त्याच्यासोबतच्या इतरही चार कैद्यांना मारहाण झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे त्या चार कैद्यांचे नातेवाईकदेखील मेडिकल रुग्णालय परिसरात एकत्र झाले होते. आम्हाला आमच्या मुलांना भेटू द्या, अशी मागणी नातेवाईकांचे पालक करत होते.
मार्च महिन्यात झाला होता दोघांचा मृत्यू
मार्च महिन्यातदेखील नागपूर मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांचा मृत्यू झाला होता. बाबुराव पंच व नरेंद्र वाहने अशी कैद्यांची नावे होती. दोघांचाही अचानक मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दोन महिन्यातील हा कारागृहातील तिसरा मृत्यू ठरला. आकाशच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येऊ शकेल.
शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी
आकाशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी रात्री नेण्यात आले. मृत्यूनंतर त्याच्या शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफीदेखील करण्यात आली. शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा असून व्हिसेरा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या शरीरावर जखमेची खूण दिसली नाही. त्यामुळे अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तुरुंगात मारहाण झाल्याने मृत्यूचा आरोप
आकाशच्या नातेवाईकांनी तुरुंगात मारहाण झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप लावला आहे. आकाशच्या शरीरावर मारल्याच्या खुणा होत्या. एक आठवड्याअगोदर त्याचे वडील भेटायला तुरुंगात गेले होते. त्यावेळी आपल्या जीवाला धोका असल्याचे आकाशने सांगितले होते. आकाशचा तुरुंगात काही गुन्हेगारांशी वाद सुरू होता. त्यात त्यांची हाणामारीदेखील झाली होती. या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठीच आकाशला मारहाण करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी लावला. तुरुंग प्रशासनाकडून यावर काहीही भाष्य करण्यात आलेले नाही.