ताडोबातील शिकारी वाघाचा गोरेवाड्यात संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:32 AM2020-06-23T10:32:39+5:302020-06-23T10:35:13+5:30
११ जूनला केटी-१ हा वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या कोलारा गावाजवळून पकडून गोरेवाडातील रेस्क्यू सेंटरमध्ये आणले होते. अतिशय धष्टपुष्ट असलेला हा वाघ २२ जूनच्या सकाळी पिंजऱ्यामध्ये निपचित पडलेला दिसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये सोमवारी सकाळी केटी-१ हा वाघ मृतावस्थेत आढळला. पाच व्यक्तींचा बळी घेणारा हा वाघ ११ जूनपासून या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. त्याच्या अकस्मात मृत्यूने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
अडीच ते तीन वर्षे वयाचा हा वाघ चांगलाच धष्टपुष्ट होता. ११ जूनला त्याला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या कोलारा गावाजवळून पकडून गोरेवाडातील रेस्क्यू सेंटरमध्ये आणले होते. सुरुवातीचे तीन दिवस त्याने काहीच खाल्ले नव्हते. त्यानंतर तो खायला लागला होता. अतिशय धष्टपुष्ट असलेला हा वाघ २२ जूनच्या सकाळी पिंजऱ्यामध्ये निपचित पडलेला दिसला. तो हालचाल करीत नसल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी याची सूचना वरिष्ठांना दिली. तपासणीनंतर तो मृत झालेला आढळला. त्याच्या आकस्मिक मृत्यूने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र त्याच्या शरीरावर सर्पदंशाच्या कोणत्याही जखमा नसल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे. शवविच्छेदनानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याच्या अहवालानंतरच खरे काय ते स्पष्ट होऊ शकेल. ताडोबा-अंधारी व्याघ्र परिसरातील कोलाराजवळील करबडा, मदनापूर, देवरी, सातारा, बामनगाव या परिसरात त्याचा वावर होता. या परिसरातील गावकऱ्यांवर हल्ला करून त्याने पाच जणांना ठार केले होते. त्यामुळे परिसरात त्याची दहशत होती. शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांनी शेतावर जाणेही बंद केले होते. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोध घेतला असता व्याघ्रहल्ल्याच्या पाचही घटनांमध्ये केटी-१ या वाघाची उपस्थिती स्पष्ट झाली.