नागपुरात ७१ टक्क्यांनी वाढले गोवर संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 07:55 AM2022-11-29T07:55:00+5:302022-11-29T07:55:01+5:30

Nagpur News नागपूर जिल्ह्यात या आजाराचे ९ रुग्ण पॉझिटिव्ह असलेतरी मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी संशयित रुग्णांच्या संख्येत ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Suspected measles patients increased by 71 percent in Nagpur | नागपुरात ७१ टक्क्यांनी वाढले गोवर संशयित रुग्ण

नागपुरात ७१ टक्क्यांनी वाढले गोवर संशयित रुग्ण

Next
ठळक मुद्दे२७८ संशयितांची नोंद, ९ रुग्ण पॉझिटिव्ह

सुमेध वाघमारे

नागपूर : मुंबईत गोवरच्या साथीमुळे प्रशासन हादरले आहे. नागपूर जिल्ह्यात या आजाराचे ९ रुग्ण पॉझिटिव्ह असलेतरी मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी संशयित रुग्णांच्या संख्येत ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नागपूर शहर व ग्रामीण मिळून २७८ संशयित रुग्ण आहेत.

‘ब्रायेरीॲस मॉर्बिलोरम’ या विषाणूंमुळे होणारा गोवर हा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. मुख्यत्वे हा रोग लहान मुलांमध्ये आढळतो; परंतु काही वेळा प्रौढांनाही होऊ शकतो. या आजाराचा उद्रेक मुंबईत झाला आहे. येथे २९२ रुग्ण आढळून आले असून १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या गोवरचे दहाच्या आत रुग्ण असलेतरी खबरदारी म्हणून लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. परंतु संशयित रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे दिसून येत असल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

मागील वर्षी होते १६२ संशयित रुग्ण

आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाकडून उपलब्ध माहितीनुसार, मागील वर्षी शहरात ६४ संशयित व २ पॉझिटिव्ह तर, ग्रामीणमध्ये ९८ संशयित व ६ पॉझिटिव्ह, असे एकूण १६२ संशयित व ८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होती. सध्या जानेवारी ते २६ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान शहरात ११४ संशयित व २ पॉझिटिव्ह तर ग्रामीणमध्ये १६४ संशयित व ७ पॉझिटिव्ह असे एकूण २७८ संशयित रुग्ण व ९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे.

-गोवर बालकांच्या मृत्यूचे मुख्य कारण

गोवर हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर १० ते १२ दिवसांनंतर लक्षणे दिसू लागतात आणि ७ ते १० दिवसांपर्यंत टिकतात. या आजारांमध्ये उद्भवणारा अतिसार, न्यूमोनिया आणि मेंदू संसर्ग यांसारख्या गुंतागुंतीमुळे मृत्यू होऊ शकतो. गोवर बालकांच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरले आहे. परंतु लसीचे दोन्ही डोसमुळे ९४ टक्के मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो.

- ही घ्या काळजी

गोवर हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर विशिष्ट असे औषध नाही. लक्षणांनुसार त्यावर उपचार केले जातात. गोवर झालेल्या रुग्णांने पुरेशी विश्रांती घेणे, इतरांपासून वेगळे ठेवणे गरजेचे असते. पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करणे व ताप नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

 

 

Web Title: Suspected measles patients increased by 71 percent in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य