मद्यधुंद पोलीस शिपाई निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 10:39 PM2017-07-31T22:39:13+5:302017-07-31T22:39:13+5:30

Suspended drunken policemen | मद्यधुंद पोलीस शिपाई निलंबित 

मद्यधुंद पोलीस शिपाई निलंबित 

Next

नागपूर, दि. ३१ - व्यसन जडलेल्या एका पोलीस शिपायाचा दारूने घात केला. भूषण झरकर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्यामुळे संतप्त नागरिकांकडून रविवारी सायंकाळी त्याची धुलाई  झाली. तर, त्याच्या या वर्तनामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सोमवारी निलंबनाचा बडगा उगारला.   

सात वर्षांपूर्वी पोलीस खात्यात दाखल झालेल्या भूषणला सुरुवातीलाच  बजाजनगर  पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली. नवीन असल्यामुळे आणि चांगले काम करीत असल्यामुळे त्याला रस्त्यावरील गुन्हेगारी, अवैध धंदेवाल्यांना आवरण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ती तो पार पाडत होता. मात्र, दारूच्या व्यसनाने त्याचा घात केला. ड्युटी संपताच तो दारूचा पेला जवळ करीत होता.  रविवारी त्याची ड्युटी शंकरनगर बीटमध्ये चार्ली म्हणून होती. भूषणने दुपारी ३ वाजेपर्यंत ड्युटी केल्यानंतर मित्रांसोबत सायंकाळपर्यंत मद्यप्राशन केले. सायंकाळी घरी परत जात असताना व्हीएनआयटी गेटजवळ एका हातठेल्यावर शेंगा अन् भुट्टा विकणाऱ्याजवळ तो गेला. गरम भुट्टा तातडीने पाहिजे असे म्हणत भूषणने दमदाटी केली. हातठेलेवाल्याने नकार दिल्याने त्यांच्यात वाद वाढला. यानंतर भूषणने तो हातठेला उलथवला. त्यामुळे शेगडीतील निखारे आजूबाजूच्यांच्या अंगावर उडाले. परिणामी हातठेलाचालकासोबतच बाजूची मंडळीही संतप्त झाली. त्यांनी भूषणची बेदम धुलाई केली. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून बजाजनगर पोलिसांना कळविण्यात आले. त्यामुळे घटनास्थळावर पोहचलेल्या पोलिसांनी भूषणला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ठाणेदार सुधीर नंदनवार यांना ते कळताच त्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. हे कळताच भूषणने ठाण्यातून पळ काढला.

 वरिष्ठांकडून गंभीर दखल

हा सर्व घटनाक्रम पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांना कळताच त्यांनी गंभीर दखल घेतली. ठाणेदार नंदनवार यांना चौकशी करून तातडीने अहवाल देण्यास सांगितले. नंदनवार यांनी सोमवारी दुपारी अहवाल दिल्यानंतर उपायुक्त पाटील यांनी भूषणला निलंबित करण्याचा आदेश जारी केला. या प्रकारामुळे पोलीस खात्यात खळबळ निर्माण झाली आहे. 

Web Title: Suspended drunken policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.