नागपुरात वन अधिकाऱ्यावर निलंबित कर्मचाऱ्याचा हल्ला : आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 10:15 PM2019-06-01T22:15:53+5:302019-06-01T22:16:37+5:30
महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या कार्यालयात घुसून एका निलंबित अकाऊंटंटने विभागीय वन अधिकाऱ्यावर हल्ला केला. अधिकाऱ्याच्या डोक्यावर काठीने प्रहार करीत जखमी केले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाताच्या सुमारास सिव्हील लाईन्स येथील प्रशासकीय इमारत क्रमांक २ येथे घडली. या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचारी हादरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या कार्यालयात घुसून एका निलंबित अकाऊंटंटने विभागीय वन अधिकाऱ्यावर हल्ला केला. अधिकाऱ्याच्या डोक्यावर काठीने प्रहार करीत जखमी केले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाताच्या सुमारास सिव्हील लाईन्स येथील प्रशासकीय इमारत क्रमांक २ येथे घडली. या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचारी हादरले आहेत.
दिवाकर बाबुराव धांडे (५०) रा. जुनी शुक्रवारी कुणबीपुरा असे आरोपीचे नाव आहे तर महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे विभागीय वन अधिकारी (डीएफओ ) कमलाकर धामगे (५७) असे जखमीचे नाव आहे. महाराष्ट्र राज्याच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे कार्यालय सिव्हील लाईन्स येथील प्रशासकीय इमारत क्रमांक -२ च्या चौथ्या माळ्यावर आहे. आरोपी धांडे हा या कार्यालयात अकाऊंटंट म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धांडे यांच्या बेजबाबदार कामामुळे वरिष्ठ अधिकारी त्रासले होते. गेल्या २० मे रोजी धांडे याने डीएफओ धामगे यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करीत धमकी दिली होती. या प्रकरणाला गांभीर्याने घेत प्राधिकरणाचे प्रभारी सदस्य सचिव व मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी २३ मे रोजी धांडे याला निलंबित केले होते. यामुळे धांडेच्या मनात धामगे यांच्याबद्दल आणखीनच राग निर्माण झाला.
सूत्रानुसार निलंबित झाल्यानंतरही धांडे हा कार्यालयात येत होता. त्याचे म्हणणे होते की, त्याला मुख्य वनसंरक्षकांनी निलंबनाचे थेट पत्र दिलेले नाही. शुक्रवारी सुद्धा दुपारी २ वाजता सर्व कर्मचारी जेव्हा जेवण करायला गेले. तेव्हा धांडे कार्यालयात आला आणि गोंधळ घातला. तो सरळ डीएफओच्या कक्षात घुसून धमकावू लागला. डीएफओ धामगे यांनी त्याला समजावत बाहेर जाण्यास सांगितले. यावर धांडेने काठी घेऊन हल्ला केला. धामगे यांनी त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु धामगे यांच्या डोक्याला मार बसला. ते जखमी झाले. डोक्यातून रक्त वाहू लागले. डीएफओंना रक्तबंबाळ अवस्थेत पाहून कार्यालयातील इतर कर्मचारीही हादरले. महिला कर्मचारी दहशतीत आल्या. डीएफओ धामगे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे आणि जखमी करण्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.