दारू पिऊन वाहन चालविल्यास परवाना निलंबित
By admin | Published: May 13, 2016 03:20 AM2016-05-13T03:20:11+5:302016-05-13T03:20:11+5:30
आता दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे किंवा लाल सिग्नल तोडणे आदी प्रकार वाहनचालकांना चांगलेच महागडे पडणार आहेत.
परिवहन आयुक्तांचे निर्देश : तीन महिन्यांपर्यंत कारवाईचे निर्देश
नागपूर : आता दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे किंवा लाल सिग्नल तोडणे आदी प्रकार वाहनचालकांना चांगलेच महागडे पडणार आहेत. परिवहन आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली असून, तीन महिन्यांपर्यंत दोषी वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याचे निर्देश आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.
चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाही तर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. शहरातील मोजकेच चौक सोडल्यास इतर चौकात वाहतूक पोलिसच राहत नाही. यामुळे बहुसंख्य चौकांमध्ये सामूहिकपणे वाहनचालक सर्रास सिग्नल तोडतात. ज्या चौकाच्या एका कोपऱ्यात सावलीत पोलीस उभे असतात तो मार्ग सोडल्यास इतर मार्गावरील लाल दिव्यात वाहन दामटतात. गेल्या वर्षी वाहतुकीची पायमल्ली करणाऱ्या सुमारे १०८७ वाहनचालकांचा परवाना वाहतूक पोलिसांनी पुढील कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पाठविले. मात्र, यातील २९७ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. दारू पिऊन वाहन चालविणे व इतरांवर ६० दिवसांचे निलंबन करण्यात आले. असे असतानाही वाहतूक गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. याची दखल परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतली. गंभीर वाहतूक गुन्ह्यासंदर्भात उदा. दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, लाल सिग्नल तोडणे आदी गुन्ह्यांसाठी वाहन चालविणाऱ्याचा वाहन परवाना कमीतकमी तीन महिने कालावधीसाठी निलंबित करण्याबाबत निर्देश सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) दिले आहे. (प्रतिनिधी)
विशेष तपासणी मोहीम सुरू
वाढत्या वाहतूक गुन्ह्यांसंदर्भात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचेही निर्देश परिवहन कार्यालयांनी दिले आहेत. यात वेगळे पथक तयार करून पोलिसांची मदत घेऊन ही मोहीम राबविण्याची सूचनाही देण्यात आली आहे. दोषी प्रकरणात परवाना निलंबित करण्याचे अधिकार परिवहन विभागास आहे. यामुळे पोलीस विभागाकडून जी प्रकरणे या संबंधित कारवाईसाठी परिवहन विभागाकडे दिली जातील त्या सर्व प्रकरणात मोटार वाहन कायदा १९८८ कलम १९, केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ च्या कलम २१ नुसार वाहनचालकाचा परवाना कमीतकमी तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे पत्रात म्हटले आहे. ही मोहीम ९ ते २१ मे या दरम्यान राबविण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
अपुऱ्या मनुष्यबळात कशी होणार मोहीम यशस्वी
शहर, ग्रामीण आरटीओ कार्यालय व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या निरीक्षकांच्या बदल्यांमुळे अनेक निरीक्षक सुट्यांवर तर काही अद्यापही रुजू झालेले नाहीत. कामाचा ताण व उन्हाच्या तडाक्यामुळे काही निरीक्षक वैद्यकीय रजेवर आहेत. आहे त्या निरीक्षकांच्या भरवशावर रोजची कामे व खासगी बसेस तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. आता यात या नव्या मोहिमेची भर पडल्याने मोहिमेच्या यशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.