कारागृहात मोबाईल व गांजा पुरवठाप्रकरणी निलंबित पीएसआयला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 09:42 PM2022-09-14T21:42:48+5:302022-09-14T21:44:08+5:30
Nagpur News कारागृहातील मोबाइल व गांजा पुरवठा प्रकरणात निलंबित पीएसआय प्रदीप नितवणे याला बुधवारी अटक करण्यात आली आहे.
नागपूर : कारागृहातील मोबाइल व गांजा पुरवठा प्रकरणात निलंबित पीएसआय प्रदीप नितवणे याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. तो १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार असून, चौकशीदरम्यान तथ्य समोर येण्याची शक्यता आहे.
५ सप्टेंबर रोजी मकोका गुन्हेगार सूरज कावळे याला कारागृहात गांजा आणि १५ मोबाइल बॅटऱ्या घेऊन पकडण्यात आले होते. सूरज आणि निलंबित पीएसआय प्रदीप नितवणे एकाच बॅरेकमध्ये राहत होते. प्रदीपकडे कारागृहात मोबाइल होता, जो सूरजनेही वापरला होता. मोबाइल बॅटरी, सीमकार्ड व गांजा खरेदी करण्यासाठी प्रदीपने त्याचा भाऊ पोलीस हवालदार सचिन नितवणे याला आरोपी सूरज वाघमारे व सूरजचा भाऊ शुभम कावळेच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले होते.
तपासाच्या आधारे पोलिसांनी सूरज कावळे, त्याचा भाऊ सचिन कावळे, शुभम नितवणे, सूरज वाघमारे, भगीरथ खारगयाल, अथर्व प्रमोद खटाखटी, मोरेश्वर सोनवणे आणि मुकेश ऊर्फ बाबू नायडू यांना अटक केली. १२ सप्टेंबर रोजी सर्वजण न्यायालयीन कोठडीत गेले. यानंतर बुधवारी निलंबित पीएसआय प्रदीप नितवणे यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी प्रदीपला न्यायालयात हजर केले. सूरज कावळे आणि प्रदीप नितवणे हे या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. उलटतपासणीनंतर न्यायालयाने प्रदीपला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रदीप गडचिरोली पोलिसांत तैनात होता.
सिव्हिल लाइन्स येथील एएनओ कार्यालयात त्याची नियुक्ती करण्यात आली होती. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते.