नागपूरच्या गांधीबाग झोनचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:52 PM2019-01-21T22:52:17+5:302019-01-21T22:54:50+5:30
शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असतानाच गांधीबाग झोनमध्ये घाण व कचरा आढळून आल्याने नाराजी व्यक्त करीत महापालिका आयुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असतानाच गांधीबाग झोनमध्ये घाण व कचरा आढळून आल्याने नाराजी व्यक्त करीत महापालिका आयुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आल्या.
स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही. घाण वा कचरा आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी आधीच दिला होता. त्यानुसार कारवाई करीत गांधीबाग झोनचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील तुर्केल यांना निलंबित करण्यात आले. तसेच झोनल अधिकारी सुरेश खरे व निरीक्षक करण सिंह बेहुनिया यांना कारणे द्या नोटीस बजावून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अनेकदा बैठकी घेतल्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी निर्देश दिले. कचरा संकलन व स्वच्छतेच्या बाबतीत दक्षता बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी बैठकीतून दिला होता. आयुक्तांनी आधी झोन स्तरावर दौरा करून स्वच्छतेचा आढावा घेतला. त्यानंतर आयुक्तांनी आकस्मिक भेटी देऊ न स्वच्छतेची पाहणी करण्याला सुरुवात केली. १५ जानेवारीला आयुक्तांनी गांधीबाग झोनचा दौरा केला. झोनच्या कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी घाण आढळून आली.
कचरा संकलन केंद्रावर कचऱ्याचे ढिगारे आढळून आले. तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तुर्केल यांना खुलासा मागण्यात आला. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने आयुक्तांनी तुर्केल यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. तसेच झोनल अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. यापूर्वी स्वच्छतेच्या संदर्भात नेहरुनगर झोनचे आरोग्य निरीक्षक मदन नागपुरे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतरही स्वच्छतेबाबत झोन स्तरावरील अधिकारी गंभीर नसल्याचे दिसत आहे.
उशिरा आल्यास वेतन कपात
ड्युटीवर उशिरा येणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळायला आयुक्तांनी सुरुवात केली आहे. डिसेंबर पेड इन जानेवारीमध्ये मिळणाऱ्या वेतनातून निर्धारित वेळेत पंचिंग न झाल्यास वेतनात कपात करण्यात येणार असल्याबाबत परिपत्रक काढले आहे. यावर कर्मचारी संघटनांनी आक्षेप नोंदविला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मते प्रशासन अशा स्वरुपात वेतनातून थेट कपात करू शकत नाही. नियमानुसार वेळेत कामावर हजर न झाल्यास संचित रजेतून ही रक्कम कापणे अपेक्षित आहे. वेतन कपातीच्या मुद्यावरून कर्मचारी संघटना व प्रशासनात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या निर्देशानुसार याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.