नागपूर लोहमार्ग पोलिसातील दोन शिपाई निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:02 AM2019-02-12T00:02:07+5:302019-02-12T00:03:06+5:30
काम करताना बेजबाबदारपणाचा आरोप ठेवून लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सोमवारी हा आदेश काढला असून, आदेशानुसार दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काम करताना बेजबाबदारपणाचा आरोप ठेवून लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सोमवारी हा आदेश काढला असून, आदेशानुसार दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
भोजराज प्रधान आणि नितीन मानकर अशी निलंबित करण्यात आलेल्या शिपायांची नावे आहेत. राजीव दुबे (३९) रा. मुंबई तसेच मूळ नागपूरच्या रमीक सोसायटी, उत्थाननगर, गोरेवाडा रिंगरोड येथील रहिवासी आहे.त्याने मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. त्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून शेगाव रेल्वे पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. ही घटना शनिवारी घडली. शनिवारी सकाळी आरोपी दुबेला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून त्याचे बयान घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आरोपी दुबे ठाण्यातून फरार होण्यात यशस्वी झाला. प्रधान आणि मानकर यांना निलंबनाची नोटीस मिळताच, पुढील कारवाई कुणावर होणार, याबाबत मुख्यालय आणि लोहमार्ग पोलीस ठाण्यात चर्चा सुरू आहे.
प्रभारी अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात बदली
या प्रकरणातील आरोपी राजीव दुबे फरार झाल्याच्या प्रकरणात पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी ठाण्यातील तत्कालीन प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप गोंडाणे यांची तात्काळ प्रभावाने नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
आरोपी अद्यापही फरारच
फरार झालेला आरोपी राजीव दुबे अद्यापही फरार आहे. आरोपीच्या शोधासाठी लोहमार्ग पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. ठाण्यातून पळून गेल्याबद्दल आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम २२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबेला अटक केल्यानंतर त्यास शेगाव लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आरोपी राजीव दुबेला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर डायरीवर महिला कर्मचारी होती. विशेष म्हणजे तिचा डायरी सांभाळण्याचा हा पहिला दिवस होता. ठाण्यात कोणतेही प्रकरण आल्यानंतर त्यावेळी जो अधिकारी असतो त्याच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येतो. अशास्थितीत नाईट ऑफिसरसोबत चर्चा करून पुढील कारवाई करण्यात आली. त्यानंतर डे ऑफिसर आले. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. यात डे आणि नाईट ऑफिसर सारखेच जबाबदार असल्याची चर्चा लोहमार्ग पोलिसात सुरू आहे.