चहापानावरील विरोधकांच्या बहिष्काराबाबत 'सस्पेन्स' कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 09:03 PM2019-12-14T21:03:20+5:302019-12-14T21:04:14+5:30
सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानाला उपस्थिती लावण्याबाबत विरोधकांची अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानाला उपस्थिती लावण्याबाबत विरोधकांची अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही. या चहापानाला जाण्यासंदर्भात बहुतांश भाजपा आमदार तयार नाहीत. तरीदेखील अंतिम निर्णय हा रविवारी सकाळी ११ वाजता नागपुरात होणाऱ्या बैठकीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परंपरेनुसार मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित करतात. साधारणत: विरोधकांकडून सरकार समस्यांप्रति गंभीर नसल्याचा आरोप करत यावर बहिष्कार टाकण्यात येतो. यंदा उद्धव ठाकरे यांचे हे मुख्यमंत्री म्हणून पहिलेच अधिवेशन राहणार आहे. त्यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता ‘रामगिरी’ येथे विरोधकांना चहापानासाठी निमंत्रित केले आहे. यासंदर्भात भाजपाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश भाजप आमदार हे शिवसेनेपासून नारज आहे. त्यामुळे चहापानाला जाऊ नये असे त्यांचे मत आहे. तर पक्षाचे धुरिण महाविकास आघाडी सरकारला काही वेळ देण्याच्या बाजूने आहेत. भविष्यात शिवसेनेसोबत परत चांगले संबंध होण्याची तसेच राष्ट्रवादीचे सहकार्य मिळण्याची शक्यता संपलेली नसल्याचे काही नेत्यांचे मानणे आहे. त्यामुळे चहापानाला उपस्थित राहून ते सकारात्मक संदेश देऊ इच्छितात. त्यामुळे रविवारच्या बैठकीवर सर्वकाही निर्भर राहणार आहे.
अद्याप अंतिम निर्णय नाही : फडणवीस
यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संपर्क केला असता अद्यापपर्यंत चहापानाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रविवारच्या बैठकीत आमदारांचे मत लक्षात घेऊन याबाबत आम्ही भूमिका ठरवू, असे त्यांनी सांगितले.