बीटीपीतील संशयास्पद मृत्यूचे रहस्य गडद

By admin | Published: September 15, 2015 06:17 AM2015-09-15T06:17:31+5:302015-09-15T06:17:31+5:30

पूर्वा हेडाऊच्या संशयास्पद मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या बीटीपी फार्महाऊसमध्ये यापूर्वी असेच काही संशयास्पद मृत्यू

The suspense of suspicious death in BTP is dark | बीटीपीतील संशयास्पद मृत्यूचे रहस्य गडद

बीटीपीतील संशयास्पद मृत्यूचे रहस्य गडद

Next

नागपूर : पूर्वा हेडाऊच्या संशयास्पद मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या बीटीपी फार्महाऊसमध्ये यापूर्वी असेच काही संशयास्पद मृत्यू झाले. मात्र, ते पद्धतशीर दडपले गेल्याची कुजबूज वाढली आहे. दरम्यान, चार दिवस होऊनही पूर्वा हेडाऊच्या मृत्यूमागचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सिराज शेख याची पोलीस कोठडी संपली. त्यामुळे बीटीपीत यापूर्वी झालेल्या अन्य काही संशयास्पद मृत्यूंप्रमाणेच पूर्वाच्या संशयास्पद मृत्यूचे रहस्य गडद झाले आहे. दरम्यान, दडपण्यात आलेल्या मनोज काटगाये मृत्युप्रकरणाची फाईल ग्रामीण पोलिसांनी उघडली असून, त्यातील तथ्य तपासण्यासाठी सिराजला अटक करून त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे.
दिघोरीतील रहिवासी मनोज वासुदेवराव काटगाये (वय २७) आपल्या मित्रांसह ७ सप्टेंबरला बीटीपी फार्महाऊसवर पार्टीसाठी गेला होता. प्रसाद माढेकर, अभिजित बोढारेच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती आहे. त्यात १५ जण सहभागी झाले होते. ४०० रुपये प्रत्येक तरुणाकडून घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे याही पार्टीत दारू आणि अन्य अंमलीपदार्थाच्या वापरासाठी आणि गैरप्रकारासाठी हे फार्महाऊस मोकळे करून देण्यात आले. पार्टीत सहभागी झालेला मनोज स्विमिंग पूलमध्ये बुडाला. त्याला बेशुद्धावस्थेत नागपुरात पाठविण्यात आले. एका खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून चुप्पी साधली.
मनोज प्रकरणाची कुणकुण कळमेश्वर पोलिसांना लागली होती. मात्र, सिराज आणि या फार्महाऊसचे व्यवस्थापन करणारी ‘आंटी’सोबत सलोख्याचे संबंध असल्यामुळे कळमेश्वर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी मनोजचे संशयास्पद मृत्युप्रकरण त्यावेळी दडपले गेले. मात्र, पूर्वाच्या मृत्यूमुळे मनोजच्याही संशयास्पद मृत्यूला वाचा फुटली. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी स्वत: या प्रकरणाची फाईल मागून घेतल्यामुळे नाईलाजाने कळमेश्वर पोलिसांनी सिराज शेखवर गुन्हा दाखल केला. त्याला सोमवारी कोर्टात हजर करून त्याची दोन दिवसांची कोठडीही मिळविली. विशेष म्हणजे, या फार्महाऊसवर बांधकाम सुरू असताना काही महिन्यांपूर्वी एका मजूर दाम्पत्याच्या मुलाचा करुण अंत झाला होता, अशी चर्चा आहे. ते प्रकरणही पद्धतशीर दडपले गेले. पोलीस त्या प्रकरणाचे खोदकाम करणार काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
इतर ठिकाणांचे काय होणार?
४बीटीपीसारखेच गैरप्रकरण ग्रामीण भागातील अनेक फार्महाऊस, रिसोर्ट आणि बारमध्ये सुरू आहे. तेथेही डर्टी पार्ट्यांच्या आयोजनासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. काही बारचे मध्यरात्रीनंतर चक्क डान्सबारमध्ये रूपांतर होते. त्या क्षेत्रातील पोलिसांसोबत देण्या-घेण्याचे व्यवहार सांभाळले जात असल्यामुळे डान्सबारकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. दोन आठवड्यांपूर्वी काटोल परिसरातील बारमध्ये असाच एक प्रकार घडल्याची माहिती आहे.

Web Title: The suspense of suspicious death in BTP is dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.