तीन वर्षांत ‘मेडिकल’सह पाच रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:21 AM2018-01-05T00:21:18+5:302018-01-05T00:23:02+5:30
अन्न व औषध प्रसासन विभागाच्या नियमांचे पालन न करणे शहरातील रक्तपेढ्यांना महागात पडले. २०१४ सालापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह पाच रक्तपेढ्यांचे परवाने विभागातर्फे निलंबित करण्यात आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : अन्न व औषध प्रसासन विभागाच्या नियमांचे पालन न करणे शहरातील रक्तपेढ्यांना महागात पडले. २०१४ सालापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह पाच रक्तपेढ्यांचे परवाने विभागातर्फे निलंबित करण्यात आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१४ ते ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत शहरात किती रक्तपेढ्या सुरू झाल्या, विभागाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे किती रक्तपेढ्यांवर कारवाई झाली, या कालावधीत किती रक्त जमा झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाकडे शहरातील १३ रक्तपेढ्यांची नोंद आहे. १ जानेवारी २०१४ ते ३० नोव्हेंबर २०१७ या काळात ‘मेडिकल’, ‘सुपर स्पेशालिटी’, लता मंगेशकर इस्पितळ रक्तपेढीसह आणखी दोन खासगी रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले होते.
या कालावधीत शहरात केवळ एका नवीन रक्तपेढीचा परवाना मंजूर करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे रक्तपेढ्यांमध्ये किती युनिट रक्त जमा झाले व किती रक्त खराब झाले, याची माहिती कार्यालयात उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.