टंकलेखन परीक्षेत बाेगसगिरीचा संशय, शहरापासून २५ किमी दूर परीक्षा केंद्र कसे?
By निशांत वानखेडे | Published: June 11, 2024 06:17 PM2024-06-11T18:17:37+5:302024-06-11T18:18:24+5:30
संघर्ष समितीचा आराेप : सुविधा नसल्याने पाेहचण्यास शेकडाे विद्यार्थ्यांना मनस्ताप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संगणक टंकलेखन (टायपिंग) परीक्षेसाठी आवश्यक सुविधा असलेले अनेक केंद्र नागपूर शहरात असताना येथील विद्यार्थ्यांना शहरापासून २५ किलाेमीटर दूरचे केंद्र देण्यावर आक्षेप घेतला जात आहे. केंद्रावर पाेहचण्यास सुविधा नसल्याने शेकडाे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केवळ गैरप्रकार करण्यासाठी असे केंद्र देण्यात आल्याचा आराेप महाराष्ट्र राज्य संगणक टायपिंग संघर्ष समितीने केला आहे.
राज्यात विविध अस्थापनांच्या क्लरिकल पदांसाठी टंकलेखन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सध्या दाेन सत्रात संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येत आहे. इंग्रजी टायपिंगसाठी १० ते १४ जून या कालावधीत आणि मराठी, हिंदी टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा १८ ते २० जून या कालावधीत घेण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातून ८ ते १० हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर प्रत्येकी एक केंद्र आहेत. नागपूर शहरात आदर्श हायस्कूल, श्रीकृष्णनगर आणि विदर्भ बुनियादी हायस्कूल, सक्करदरा असे दाेन केंद्र आहेत. मात्र शहरातील शेकडाे विद्यार्थ्यांना २५ किमी दूर आठवामैल, दृगधामना येथील श्री साई ताज पाॅलिटेक्निक काॅलेजचे सेंटर देण्यात आले आहे. टायपिंग इन्स्टिट्यूटच्या जवळच परीक्षा केंद्र असताना असे डाेंगराळ अनिवासी परिसरात परीक्षा केंद्र का दिले, असा प्रश्न संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश हरणे यांनी उपस्थित केला.
हरणे यांनी सांगितले, श्री साई पॉलीटेक्निक कॉलेज परिसरात नागरी वसाहत नाही, अतिशय खराब रस्ता, तसेंच एसटी बस/शहर स्टार बस पोहचत नाही. अशा डोंगराळ परिसरात परीक्षा केंद्र निवड करण्याचा हेतू काय, असा सवाल त्यांनी केला. परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागताे. या केंद्रावर भरारी पथकही वेळेवर पाेहचू शकत नाही. त्यामुळे केवळ गैरप्रकार करण्यासाठी शहरातील काही संस्था चालकांनी याची मागणी करून, हे परीक्षा केंद्र निवडल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरबी येथील संस्थेचे ३० विद्यार्थी परीक्षेसाठी सुनसान रस्त्याने या केंद्रावर कसेबसे पाेहचले. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनीही राेष व्यक्त केला.
परीक्षा परिषद अध्यक्षांच्या पत्रात इशारा
परीक्षा केंद्रावर डमी विद्यार्थी बसविणे, टंकलेखनात निपूण उमेदवारांकडून इतर उमेदवारांची उत्तरपत्रिका टंकलिखित करणे, जाणीवपूर्वक संगणक बंद करून वेळ वाया घालविणे व नंतर इतरांकडून उत्तरपत्रिका साेडवून घेणे, परीक्षार्थी अदलाबदल करणे, असा प्रकार चालताे. त्यामुळे उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी परीक्षा केंद्रावर आकस्मिक भेटी देण्याचे निर्देश परीक्षा परिषद अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या निर्देशांचे पालन हाेते का, हा प्रश्न आहे.