हवालदाराच्या मनोरुग्ण पत्नीचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: February 17, 2017 02:58 AM2017-02-17T02:58:49+5:302017-02-17T02:58:49+5:30
पोलीस हवालदाराच्या मनोरुग्ण पत्नीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलीस लाईन टाकळी परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतदेह कुजला : शेजाऱ्याने दिली माहिती, पती होता मागच्या दारात
नागपूर : पोलीस हवालदाराच्या मनोरुग्ण पत्नीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलीस लाईन टाकळी परिसरात खळबळ उडाली आहे. सुनीता अरविंद पांडे (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, मृतदेह कुजल्याने दुर्गंधी असह्य झाली. त्यामुळे शेजारच्या पोलिसाने गिट्टीखदान ठाण्यात फोनवरून माहिती दिली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृत सुनीताचे पती हवालदार अरविंद पांडे मागच्या दारात उभे होते. त्यामुळे हे प्र्रकरण संशयास्पद ठरले असून, परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
हवालदार पांडे सध्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असून, ते पोलीस लाईन टाकळी येथील ‘पथरीगड‘ सहनिवासात (ई -२४/ ३) राहत होते. गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास शेजारी राहणारे पोलीस उपनिरीक्षक त्रिपाठी यांनी गिट्टीखदान ठाण्यात फोन केला. हवालदार अरविंद पांडे यांची मनोरुग्ण पत्नी काही दिवसांपासून घराबाहेर आली नसून, त्यांच्या घरातून असह्य दुर्गंधी येत असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.
या माहितीवरून गिट्टीखदानचे सहायक पोलीस निरीक्षक के. टी. कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह पथरीगडमध्ये पोहोचले. त्यांनी दार उघडून बघितले तेव्हा सुनीता पांडे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. विशेष म्हणजे, यावेळी हवालदार पांडे (मृत सुनीताचे पती) मागच्या दाराजवळ उभे होते. हा प्रकार कांबळे यांनी वरिष्ठांना कळविला. त्यानंतर मृतदेह मेयोत रवाना करण्यात आला.
पत्नीचा मृतदेह कुजल्या अवस्थेत घरात पडून असताना तुम्ही पोलिसांना का कळविले नाही, हा मुद्दा संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी पांडेंची विचारपूस केली. आपण आधी नातेवाईकांना फोन करून सुनीताच्या मृत्यूची माहिती देत होतो, असे यावेळी पांडेंनी पोलिसांना सांगितले.
प्राथमिक चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, सुनीता ही अरविंद पांडेची दुसरी पत्नी होय. त्याच्या पहिल्या पत्नीचा आजारपणामुळेच मृत्यू झाला होता. पहिल्या पत्नीपासून असलेला पंकज (वय २३) नामक मुलगा जबलपूरला वेकोलित कार्यरत आहे.
सुनीतासोबत पांडेंनी १९९७ ला दुसरे लग्न केले. सुनीता उत्तर प्रदेशातील मूळ निवासी असून, ती पांडेंच्या नात्यातच लागत होती. याच ओळखीतून पांडेचे सुनीतासोबत लग्न झाले.(प्रतिनिधी)
मनोरुग्ण सुनीता एकटीच राहायची
काही वर्ष चांगले चालल्यानंतर सुनीताची प्रकृती वारंवार बिघडू लागली. ती मनोरुग्ण झाली. प्रारंभी तिचा औषधोपचार करणाऱ्या पांडेंनी अलीकडे सुनीताला वाऱ्यावर सोडले. ती दोनवेळा घरून निघून गेल्याने पांडेंनी सीताबर्डी आणि गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली होती, नंतर ते तिला चक्क घरात डांबून ठेवू लागले. गिट्टीखदान पोलिसांनी आज सांगितलेल्या माहितीनुसार, घराबाहेर पडताना हवालदार पांडे बाहेरून दाराला कुलूप लावायचे. दार बंद असलेल्या घरात बिचारी सुनीता एकटीच घरी राहायची. तिच्या औषधोपचारासह खाण्यापिण्याकडेही पांडे लक्ष देत नव्हते. अलीकडे पांडे पाच ते सात दिवस घराकडेही जात नव्हते. ते बाहेरच जेवायचे आणि बाहेरच राहायचे. आठवड्यातून एखादवेळी घरी जायचे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी ते गणेशपेठ ठाण्यातून तपासकामी चंद्रपूरला गेले होते. तिकडून ते कधी परतले अन् कधी घरी आले ते कळायला मार्ग नाही. मात्र, दोन दिवसांपासून पांडेच्या घरातून तीव्र दुर्गंधी येत होती. शेजाऱ्यांना तो असह्य झाला होता म्हणजेच सुनीताचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वीच झाला असावा, असा तर्क पोलिसांनी लावला आहे.
मृतदेहावर होती चादर
मृतदेह कुजल्यामुळे असह्य दुर्गंधी पसरली असताना पांडे मृतदेहाशेजारी होते. त्यांनी पोलिसांना माहिती देण्याचे का टाळले, असा प्रश्न पोलिसांसकट साऱ्यांनाच पडला आहे. या प्रश्नामुळेच सुनीता पांडेंचा मृत्यू संशयास्पद ठरला आहे. सुनीताच्या कुजलेल्या मृतदेहावर चादर होती, ही आणखी एक संशयास्पद बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे परिसरातही उलटसुलट चर्चेला उधाण आले असून, तूर्त गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच या प्रकरणातील मुद्दे स्पष्ट होतील, त्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरवू, असे गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.