मानकापुरात कोट्यवधीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:10 AM2021-03-10T04:10:31+5:302021-03-10T04:10:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गणेशपेठमधील ६५ वर्षीय वृद्धाच्या हत्येचा उलगडा व्हायचाच असताना मानकापुरात एका ६४ वर्षीय वृद्धाचा संशयास्पद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गणेशपेठमधील ६५ वर्षीय वृद्धाच्या हत्येचा उलगडा व्हायचाच असताना मानकापुरात एका ६४ वर्षीय वृद्धाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
भय्यालाल नत्थूजी बैस असे मृताचे नाव आहे. ते गोधनीतील रहिवासी होते. बैस यांची जामठ्याजवळ १७ एकर जमीन आहे. ४० ते ५० कोटी रुपये किंंमत असलेल्या या जमिनीसाठी बैस यांच्यासोबत काही जणांचा १९६४ पासून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बैस सोमवारी सकाळी घरून निघून गेले. येतील परत असे समजून घरच्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. मंगळवारी दुपारी ४.३० च्या सुमारास बैस यांचा मृतदेह गोरेवाडा जंगल मिलिटरी ग्राऊंडजवळ आढळला. तो अर्धनग्न अवस्थेत होता. अंगावर वेगवेगळ्या जखमाही होत्या. माहिती कळताच मानकापूरच्या ठाणेदार वैजयंती मांडवधरे आणि त्यांच्यापाठोपाठ पोलीस उपायुक्त विनीता साहू आपल्या ताफ्यासह तेथे पोहचल्या. त्यांनी बैस यांच्याजवळ असलेली पिशवी तपासली. त्यातील कागदपत्रांवरून तो मृतदेह बैस यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना यासंबंधाने विचारणा केली असता ते सोमवारी सकाळपासून बेपत्ता असल्याचे तसेच त्यांच्यासोबत कोट्यवधीच्या शेतीचा वाद असल्याचेही उघड झाले. त्यामुळे बैस यांची हत्या झाली की काय, अशी शंका घेतली जात आहे.
-----
मिसिंगचीही तक्रार नाही
यासंबंधाने ठाणेदार मांडवधरे यांच्याकडे विचारणा केली असता ही हत्या आहे की नाही, ते शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे त्या म्हणाल्या. २४ तासापेक्षा जास्त अवधी झाला असला तरी आमच्याकडे बैस यांच्या बेपत्ता होण्याबाबतची त्यांच्या कुटुंबीयांकडून तक्रार आली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
----