महिला ‘शेफ’चा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: June 15, 2017 02:14 AM2017-06-15T02:14:31+5:302017-06-15T02:14:31+5:30
वर्धा रोडवरील हॉटेल प्राईडमध्ये थांबलेल्या एका खासगी कंपनीतील तरुण महिला शेफचा संशयास्पद मृत्यू झाला.
हॉटेलच्या खोलीत सापडला मृतदेह : श्वसननलिका झाली होती ब्लॉक, पोस्टमार्टममध्ये खुलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा रोडवरील हॉटेल प्राईडमध्ये थांबलेल्या एका खासगी कंपनीतील तरुण महिला शेफचा संशयास्पद मृत्यू झाला. हॉटेलच्या खोलीत तिचा मृतदेह आढळून आला. अलका प्रभाकर वलनजू (२८) रा. खारगर रोड, पनवेल, जि. रायगड असे मृताचे नाव आहे.
अल्का ही कंपनीकडून ‘डेमो’ सादर करण्यासाठी मंगळवारी नागपुरात आली होती. हॉटेलमधील खोली क्रमांक ११८ मध्ये ती थांबली होती. मंगळवारी सकाळी एका बेकरीमध्ये तिने डेमो दाखविला. सायंकाळी हॉटेलमध्ये परत आली. रात्री हॉटेलमध्येच जेवण केले. रात्री १ वाजता घरच्यांसोबत फोनवर बोलल्यानंतर ती झोपली. बुधवारी सकाळी तिच्या भावी वराने फोन केला. परंतु खूप वेळपर्यंत तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने हॉटेलच्या रिसेप्शनवर फोन करून याबाबत कळविले. तसेच खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खूप आवाज दिला. बेल वाजवली. परंतु कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सोनेगाव पोलिसांना सूचना दिली. पोलीस आल्यावर डुप्लिकेट चावीने खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा बेडवर अलका मृतावस्थेत पडली होती. तिने उलटी केल्याचेही दिसून येत होते. हॉटेलमध्येच डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. यानंतर तिच्या कुटुंबीयांना सूचना देण्यात आली.
पोलिसांनी मृतदेह मेडिकलला पाठवला. पोस्टमार्टममध्ये श्वसननलिका ‘ब्लॉक ’ झाल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले. सायंकाळी अलकाचे कुटुंबीय सुद्धा नागपूरला पोहोचले. त्यांच्याकडे अलकाचा मृतदेह सोपवण्यात आला.
अलका मिरगीच्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच तिचे साक्षगंध झाले होते. तिचे वडील अधिकारी आहेत. कुटुंबात आई-वडील आणि लहान भाऊ आहे. कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूबाबत कुठलाही संशय व्यक्त केलेला नाही. खोलीतही मृत्यूशी संबंधित कुठलेही पुरावे सापडले नाही. अलका यापूर्वी सुद्धा नागपूला येऊन गेली होती. पीएसआय साजीद अहमद यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.