प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू, उलटसुलट चर्चेला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 10:23 AM2022-07-04T10:23:06+5:302022-07-04T10:37:40+5:30
त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सावनेर (नागपूर) : मैत्रिणीसाेबत सावनेर शहरातील सटवा माता मंदिर परिसरात असलेल्या केशव लॉजमध्ये आलेल्या तरुणाचा रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास खाेलीत संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
अजय जंगलू परतेकी (२७, रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. अजय त्याच्या बिछवा-खमरापाणी, जिल्हा छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथील २३ वर्षीय मैत्रिणीसाेबत दुचाकीने सावनेर शहरातील केशव लाॅजमध्ये आला व खोली क्रमांक-१०२ मध्ये थांबला हाेता. मध्येच त्याची प्रकृती बिघडल्याने मैत्रिणीने लाॅज व्यवस्थापकाला माहिती दिली.
लाॅज मालक अनिल करारे यांनी खाेलीत जाऊन बघितले असता, ताे मृतावस्थेत पडून असल्याचे त्यांना दिसले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील शासकीय रुग्णालयात पाठविला. अजयने उत्तेजित करणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं होतं, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
हृदयविकाराची शक्यता
अजय व त्याची मैत्रीण तीन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले हाेते. दाेघेही लग्न करणार हाेते. अजयचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्याजवळ काहीही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाही. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण पाेस्टमार्टम रिपाेर्ट प्राप्त झाल्यानंतर कळेल, अशी माहिती सहायक पाेलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी दिली.
दुसरी घटना
सावनेर शहरातील लाॅजमध्ये तरुणाचा मृत्यू हाेण्याची ही अलीकडच्या काळातील दुसरी घटना हाेय. भूषण काळूराम मुसळे, रा. चिचपुरा, सावनेर या तरुणाने शहरातील संकेत लाॅजमध्ये १७ मे राेजी आत्महत्या केली हाेती. सावनेर शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या मार्गालगत हाॅटेल व लाॅजचे माेठे पीक आले आहे. यातील बहुतांश लाॅजमध्ये अनैतिक प्रकार चालत असल्याची माहिती सावनेर शहरातील नागरिकांनी दिली.