नागपुरात प्राध्यापक पती, डॉक्टर पत्नीचा मुला-मुलीसह संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:22 PM2020-08-18T22:22:42+5:302020-08-18T22:26:44+5:30

प्राध्यापक पती आणि डॉक्टर पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत त्यांच्या घरात आढळले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. १८) दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Suspicious death of professor husband, doctor wife and children in Nagpur | नागपुरात प्राध्यापक पती, डॉक्टर पत्नीचा मुला-मुलीसह संशयास्पद मृत्यू

नागपुरात प्राध्यापक पती, डॉक्टर पत्नीचा मुला-मुलीसह संशयास्पद मृत्यू

Next
ठळक मुद्देहत्या करून आत्महत्या केल्याचा संशय : कोराडी परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर / कोराडी : प्राध्यापक पती आणि डॉक्टर पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत त्यांच्या घरात आढळले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. १८) दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. धीरज राणे (४१), डॉ. सुषमा धीरज राणे (३९), ध्रुव धीरज राणे (११) आणि वन्या धीरज राणे (५) अशी मृतांची नावे असून ते संत जगनाडे सोसायटी, ओमनगर, कोराडी नाका येथे राहत होते.


धीरज राणे वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख तर डॉ. सुषमा या धंतोली, नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये नोकरी करायच्या. घरी धीरज यांची आत्या प्रमिला (६५) त्यांच्यासोबत रहायच्या. भल्या सकाळी हे कुटुंब उठायचे. मंगळवारी सकाळी ९ वाजूनही भाचा, सून नातवांपैकी कुणीच बाहेर दिसत नसल्याने प्रमिला यांनी सुषमा यांना आवाज दिला. रात्री व्यवस्थित झोप झाली नाही, असे सुषमा हिने सांगितले. त्यानंतर १ वाजता पुन्हा प्रमिला यांनी आवाज दिला. यावेळीसुद्धा सुषमा यांनी अजून झोप झाली नाही, असे सांगितले. १.३० च्या सुमारास प्रमिला यांना धीरजच्या रुमचे दार अर्धवट उघडे दिसल्याने त्या आतमध्ये गेल्या. धीरज, धुव्र आणि वन्न्या निपचित पडून होते तर, बाजूच्या रूममध्ये सुषमा गळफास लावून दिसल्याने प्रमिला या आरडाओरड करीत बाहेर आल्या. त्यांनी बाजूच्या किराणा दुकानदाराला हे सांगितले. नंतर स्वत:च्या मुलीला आणि सुषमा यांच्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षातही फोन केला. नियंत्रण कक्षाने कोराडी पोलिसांना कळविले. त्यानुसार ठाणेदार वजीर शेख आपल्या ताफ्यासह तेथे पोहोचले. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याचे कळल्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त नीलोत्पल, गुन्हे शाखेची पथके तसेच ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीमही पोहोचल्या.  धीरज, ध्रुव आणि वन्न्या या तिघांचे मृतदेह जेथे होते तेथे इंजेक्शनच्या दोन रिकाम्या सिरींज आढळून आल्या. पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या.
एकूणच घटनाक्रमावरून राणे दाम्पत्यापैकी एकाने दोन मुलांसह तिघांची हत्या करून आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.
परिसरात उलटसुलट चर्चा
या घटनेची वार्ता वायुवेगाने कोराडी आणि आजूबाजूच्या गावात पोहोचली. त्यामुळे मोठ्या संख्येत बघ्यांनी राणे दाम्पत्याच्या निवासस्थानासमोर गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी सिरींज आणि सुसाईड नोट सापडल्याचे सांगितले. यासंबंधाने जास्त माहिती देता येणार नाही, असे पोलीस अधिकारी म्हणाले. ऐन पोळ्याच्या दिवशी अत्यंत सुखवस्तू कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे पंचक्रोशीत उलटसुलट चर्चा केली जात आहे.

Web Title: Suspicious death of professor husband, doctor wife and children in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.