विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Published: January 13, 2016 03:49 AM2016-01-13T03:49:06+5:302016-01-13T03:49:06+5:30
जरीपटक्यात एका विद्यार्थ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. योगेश मनोहर वरुडकर (वय २०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
घातपाताची शंका : उलटसुलट चर्चा
नागपूर : जरीपटक्यात एका विद्यार्थ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. योगेश मनोहर वरुडकर (वय २०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असलेला योगेश तांडापेठमध्ये राहत होता. त्याचे वडील टेलिकॉम विभागातून निवृत्त झाले असून, आई गृहिणी आहे. त्याला दीप्ती आणि आशिष ही मोठी भावंड आहेत. योगेश सोमवारी सकाळी ७ वाजता मित्राकडे जातो, असे सांगून घरून निघाला. त्यानंतर तो परतलाच नाही. त्याची शोधाशोध सुरू असतानाच मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास योगेशचा मृतदेह जरीपटक्यातील म्हाडा कॉलनीत पडून दिसला. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना कळविले. योगेशच्या खिशात महाविद्यालयात शिक्षण शुल्क जमा केल्याची पावती सापडली. त्यावर त्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक नमूद असल्यामुळे योगेशची ओळख पटली. (प्रतिनिधी)
आत्महत्या की घातपात
दरम्यान, तांडापेठमध्ये राहणाऱ्या योगेशचा मृतदेह म्हाडा कॉर्टर परिसरात पडून आढळल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली. इमारतीवरून उडी मारून त्याने आत्महत्या केली की कुणी त्याला धक्का दिला ते वृत्तलिहिस्तोवर स्पष्ट झाले नाही. त्याच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सुरुवातीला योगेशची हत्या करून मृतदेह घटनास्थळी फेकल्याची शंका या भागातील नागरिक व्यक्त करीत होते. पोलिसांनी मात्र हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचे सांगून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.