महिलेचा संशयास्पद मृत्यू; डोंगरमौदा शिवारातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 11:27 PM2019-12-08T23:27:28+5:302019-12-08T23:27:59+5:30
डोंगरमौदा (ता. कुही) शिवारातील शेतात महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.
नागपूर: डोंगरमौदा (ता. कुही) शिवारातील शेतात महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरून डोक्याची कवटी, केस, हाडं, चपलेचा तुकडा व बॅग जप्त केली. ही घटना रविवारी (दि. ८) दुपारी उघडकीस आली.
लीलाबाई सूर्यभान वासनिक (६५, रा. दहेगाव, ता. कुही) या काही वर्षांपासून नागपूर येथे राहात असून, त्यांची डोंगरमौदा शिवारात शेती आहे. त्या धानाची मळणी करण्यासाठी सोमवारी (दि. २) शेतात आल्या होत्या. थ्रेशरने मळणी केल्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि. ३) धान मांढळ येथील राईस मिलवर नेले होते. शिवाय, त्यांनी बुधवारी (दि. ४) शेतातील तणसाची गंजीही लावली. त्या सुरुवातीला त्यांचा पुतण्या गिरीधर वासनिक, रा. दहेगाव यांच्याकडे तर बुधवारी शंकर वानखेडे, रा. डोंगरमौदा यांच्याकडे मुक्कामी होत्या.
दरम्यान, आई नागपूरला परत आली नाही तसेच तिच्याशी संपर्क होत नाही म्हणून त्यांच्या अनिता व पिंकी नामक दोन्ही मुली त्यांना शोधण्यासाठी रविवारी डोंगरमौदा येथे आल्या. त्यांनी सुरुवातीला गावात आईविषयी चौकशी केली आणि नंतर शेतात गेल्या. तेव्हा त्यांना त्यांच्या शेतात जळालेल्या तणसेत मृतदेह जळाल्याचे आढळून आले. त्यांच्या सूचनेवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
त्यांना घटनास्थळी डोक्याची कवटी, केस, हाडं, चपलेचा तुकडा, बांगड्या व बॅग आढळून आली. सदर साहित्य लीलाबाई यांचे असल्याची माहिती त्यांच्या दोन्ही मुलींना पोलिसांना दिली. शिवाय, उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार कविराज करीत आहेत.
‘डीएनए’ चाचणी करणार
डोक्याची कवटी व हाडे नेमकी लीलाबाई वासनिक यांचीच आहे, याबाबत पोलिसांमध्येही संभ्रम आहे. त्यांची ‘डीएनए’ टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे यांनी दिली. दुसरीकडे, लीलाबाई नेमक्या गेल्या कुठे हेही कळायला मार्ग नाही. लीलाबाई यांना पाच मुली व एक मुलगा आहे. पाचही मुली विवाहित आहेत. पिंकी ही काही कारणास्तव माहेरी राहते.