शंकेखोर पतीने पत्नीच्या सहकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 08:50 PM2022-02-23T20:50:19+5:302022-02-23T20:50:54+5:30
Nagpur News शंकेखोर पतीने पत्नीसोबत काम करणाऱ्या आरोग्य सहाय्यकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी हिंगणाच्या व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली.
नागपूर : शंकेखोर पतीने पत्नीसोबत काम करणाऱ्या आरोग्य सहाय्यकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी हिंगणाच्या व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मधुकर माकडे (५६) असे जखमी आरोग्य सहाय्यकाचे नाव आहे. माकडे हे हिंगणा प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवारत आहेत. संजय (४६) ची पत्नी याच केंद्राअंतर्गत आरोग्यसेवा देते. संजय विनाकारण पत्नीवर संशय घेत होता. यावरून दोघात अनेकदा वाद झाले.
मंगळवारी आरोग्य केंद्रात आशा वर्कर तसेच समूह प्रवर्तकांची मासिक सभा सुरु होती. सभेत ५० ते ६० आशा वर्कर आणि इतर व्यक्ती उपस्थित होते. संजयने पत्नीला फोन करून कुठे आहेस, अशी विचारणा केली. पत्नीने आरोग्य केंद्रातील मासिक बैठकीत असल्याचे सांगून मोबाईल बंद केला. पत्नीचा मोबाईल बंद आढळल्यामुळे संजय संतप्त झाला. तो चाकू घेऊन आरोग्य केंद्रात पोहोचला. खिडकीतून आत डोकावत असताना त्याच्या जवळ चाकू पाहून बैठकीला उपस्थित आशा वर्कर आणि समुह प्रवर्तक पळून गेले.
दरम्यान संजयने आत येऊन माकडेवर हल्ला केला. मान, पोट, पाठीवर आणि हातावर वार करून मधुकरला जखमी केले. काही आशा वर्कर संजयला ओळखत होत्या. त्यांनी हिंमत दाखवून संजयला पकडले व चाकू हिसकावला. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून संजयला ताब्यात घेतले व माकडेला रुग्णालयात पोहोचविले. भर सभेदरम्यान हल्ला झाल्यामुळे केंद्रातील अधिकारी, कर्मचारी दहशतीत आहेत. महिला कर्मचारी स्व:तला असुरक्षित समजत आहे.
..............