नागपुरात शिवसेना पदाधिका-याच्या घरासमोर फेकला सुतळी बॉम्ब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:52 PM2018-06-26T23:52:12+5:302018-06-26T23:53:35+5:30
शिवसेनेच्या उत्तर नागपुरातील पदाधिकाऱ्याच्या घरावर चार आरोपींनी सुतळी बॉम्ब फेकल्याची खळबळजनक घटना पाचपावलीत सोमवारी दुपारी घडली. यामुळे परिसरात सोमवारी दुपारपासून तणाव आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांसह अनेक शिवसैनिकांनी पाचपावली ठाण्यात धडक देऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेच्या उत्तर नागपुरातील पदाधिकाऱ्याच्या घरावर चार आरोपींनी सुतळी बॉम्ब फेकल्याची खळबळजनक घटना पाचपावलीत सोमवारी दुपारी घडली. यामुळे परिसरात सोमवारी दुपारपासून तणाव आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांसह अनेक शिवसैनिकांनी पाचपावली ठाण्यात धडक देऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
पाचपावलीतील वैशालीनगरजवळ मिलिंदनगर आहे. या परिसरात किशोर ठाकरे राहतात. ते शिवसेनेचे त्या भागातील पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडे शिकवणी वर्ग चालतात. त्यामुळे ठाकरे यांच्या घरासमोर दिवसभर वर्दळ असते. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास दोन दुचाक्यांवर चार आरोपी आले. त्यांनी सुतळी बॉम्ब ठाकरेंच्या घरासमोर फेकला. जोरदार आवाज झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. शिवसेना पदाधिकाºयाच्या घरासमोर बॉम्बस्फोट घडून आल्याची अफवाही पसरली. त्यामुळे परिसरात सोमवारी सायंकाळपासून तणाव निर्माण झाला. ठाकरे यांनी माहिती कळविल्यानंतर पाचपावली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन दुचाकीवर आलेल्या चार आरोपींनी बॉम्ब फेकल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या घटनेमुळे शिवसेना पदाधिकाºयात रोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी आपल्या सहकाºयांसह पाचपावली ठाणे गाठले. त्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. ठाणेदार हिवरे यांनी आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल,असे आश्वासन दिल्याने रोष निवळला.
कुणाला दुखापत नाही
पाचपावली पोलिसांनी या प्रकाराबाबत सोमवारपासून कमालीची गोपनीयता बाळगली. दरम्यान, मंगळवारी दुपारी शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याला घेराव केल्याचीही अफवा पसरली. या संंबंधाने पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी घटना घडल्याचे सांगितले. मात्र, ठाकरे यांच्यासोबतच्या शत्रुत्वामुळे हा प्रकार घडला की एखाद्या विद्यार्थ्यांच्या आपसी मतभेदातून किंवा प्रेमप्रकरणातून ही घडली, ते सांगता येणार नसल्याचे म्हटले. या घटनेत कुणालाही कोणतीच दुखापत झाली नसल्याचेही ते म्हणाले.