स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 11:22 AM2021-11-18T11:22:16+5:302021-11-18T11:28:57+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नागपुरात बुधवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे रविकांत तुपकर यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले व रातोरात पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनचे योग्य भाव मिळावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संविधान चौकात बुधवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे रविकांत तुपकर यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीमध्येही तुपकर यांनी आंदोलन सुरूच ठेवले असून, दंगलशाही खपवून घेणार नाही, सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
संविधान चौकात दुपारी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यावेळी तुपकर यांनी सांगितले की, सोयाबीनला ८ हजार रुपये आणि कापसाला १२ हजार रुपये प्रती क्विंटल भाव निश्चित करण्यात यावा. बाजारात यापेक्षा कमी किमतीत पीक विकले जाऊ नये. परंतु, सरकारने सोयापेंड आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर ११ हजारांहून ४ हजारांवर आले आहेत. दुसरीकडे पाऊस व अतिवृष्टीमुळे उत्पादनही प्रभावित झाले आहे. संघटनेने धानाला बोनस देणे, पीक विमा करणे, विमा कंपन्यांवर कारवाई व वीज कनेक्शन न कापण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पिकांवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा आहे, उद्योगपती व नेत्यांचा नाही, असे स्पष्ट करीत मागणी मान्य होणार नाही तोवर आंदोलन सुरू राहील, असा इशाराही दिला.
आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस देत आंदोलन करू नका म्हणून सांगितले. तेव्हा, “राजकीय पक्षांचे नेते कोविड प्रूफ जॅकेट घालून हजारोंच्या उपस्थितीत होणाऱ्या संमेलनात सहभागी होताहेत का?” असा सवाल तुपकर यांनी पोलिसांना केला. त्यानंतर पोलीस निघून गेले होते. रात्री उशिरा पोलीस पुन्हा आंदोलन स्थळी आले आणि तुपकरांना ताब्यात घेतले. तुपकर यांना अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, ताब्यात घेत असताना कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. यावेळी आंदोलन विदर्भभर सुरूच राहील, असे तुपकर यांनी सांगितले.
दरम्यान, प्रकृती खालावलेल्या तुपकरांना जबरदस्तीने उपचारांसाठी नागपुरात दवाखान्यात नेण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी तुपकर यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, तुपकरांनी उपचारास स्पष्ट नकार देत आपलं अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेवलं. अखेर सरकारने तुपकरांना रातोरात जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं.