राष्ट्रभक्तीच्या कवितांनी स्वामी विवेकानंदांना आदरांजली

By admin | Published: November 13, 2014 12:52 AM2014-11-13T00:52:17+5:302014-11-13T00:52:17+5:30

स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या धारदार वाणीने आणि तेजाने आपला प्रभाव सोडणारे व्यक्तिमत्त्व. ‘सिस्टर्स अ‍ॅण्ड ब्रदर्स आॅफ अमेरिका...’ या शब्दांनी शिकागोला आपल्या भाषणाचा प्रारंभ करून धर्मसंसदेत

Swami Vivekanand honored with patriotic poetry | राष्ट्रभक्तीच्या कवितांनी स्वामी विवेकानंदांना आदरांजली

राष्ट्रभक्तीच्या कवितांनी स्वामी विवेकानंदांना आदरांजली

Next

सनातन योगा श्रीनचा उपक्रम : मान्यवर समाजसेवकांचा सत्कार
नागपूर : स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या धारदार वाणीने आणि तेजाने आपला प्रभाव सोडणारे व्यक्तिमत्त्व. ‘सिस्टर्स अ‍ॅण्ड ब्रदर्स आॅफ अमेरिका...’ या शब्दांनी शिकागोला आपल्या भाषणाचा प्रारंभ करून धर्मसंसदेत स्वामी विवेकानंदांनी जगातील साऱ्या धर्मगुरूंना जिंकून घेतले. टाळ्यांचा कडकडाट त्यावेळी थांबत नव्हता. तो दिवस होता ११ सप्टेंबर १८९३. भारतीय संस्कृतीचे दर्शन स्वामींनी त्यांच्या भाषणातून जगाला करून दिले आणि तेव्हापासून हिंदू धर्माची महती जगाला कळली. त्यांच्या भाषणाला १२१ वर्षे यंदा पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त सनातन योगा श्रीन या पारंपरिक योग संस्थेतर्फे राष्ट्रभक्तीच्या कवितांचा ‘जननी जन्मभूमी’ कार्यक्रम आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन १५ नोव्हेंबर रोजी साई सभागृहात सायंकाळी ७ वाजता करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत योगाचार्य केदार जोशी यांनी दिली.
या कार्यक्रमात राष्ट्रीय कवी डॉ. व्ही. पी. सिंंग कविता सादर करणार आहेत. सिंग मेडिसीनचे प्राध्यापक असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. आतापर्यंत त्यांचे अनेक कार्यक्रम झाले असून, विविध खाजगी दूरचित्रवाहिन्यांवरही त्यांचे कार्यक्रम गाजले आहेत. त्यांचा ‘रक्तांजली’ हा कारगीलची वेदना सांगणारा कवितासंग्रह गाजला आहे. लोकमतने त्यांच्या अनेक कविता प्रकाशित के ल्या आहेत. या कवितासंग्रहाचे प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले. सनातन योगा श्रीन ही संस्था हटयोग आणि राजयोगाचा प्रसार आध्यात्मिक उन्नतीसाठी करीत आहे. या कार्यक्रमातून मिळणारा निधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट, रोटरी क्लबच्या पालिएटिव्ह कॅन्सर केअर डोनेशन आणि स्नेहांचल या कॅन्सरग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांना मुख कर्करोग झाला होता; पण अखेरपर्यंत त्यांचे कार्य अखंडित सुरू राहिले.
विवेकानंदांना आदरांजली वाहताना कॅन्सरग्रस्तांच्या आयुष्यात एक सुखद फुंकर टाकण्याचे कार्य यानिमित्ताने साधण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करून एका चांगल्या कार्यात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन डॉ. अर्चना पटेल, डॉ. लोकेंद्र सिंग, डॉ. सुधीर नेरळ, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विलास काळे, कर्नल सुनील देशपांडे, सविता संचेती यांनी केले आहे.
या कार्यक्रमात ‘सत्य सनातन अवार्ड’ने समाजासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. यात पॅथालॉजिस्ट डॉ. शोभा ग्रोव्हर, सीम्सचे संचालक डॉ. जी. एम. टावरी, स्थापत्यशास्त्रज्ञ अवंतिका चिटणवीस, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे, स्वामिनी ब्रम्हप्रकाशानंद सरस्वती आणि राष्ट्रीय कवी डॉ. व्ही. पी. सिंग यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमासाठी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमीटेडचे चेअरमन आणि खा. विजय दर्डा, खा. अजय संचेती, कविराज ट्रस्टच्या सविता संचेती, बैद्यनाथ लाईफ सायन्सेस, इंडियन आर्मी जीआरसी कामठी, जयका क्रॉसवर्ड आणि दोसा प्लाझा यांनी आर्थिक सहकार्य दिले आहे. या कार्यक्रमाचे प्रवेशपत्र सनातन योगा श्रीन, बैद्यनाथ लाईफ सायन्सेस, हिस्लॉप कॉलेज समोर, सिव्हिल लाईन्स येथे उपलब्ध आहेत, असे योगाचार्य केदार जोशी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. अर्चना पटेल, मिनू भंडारी, निधी काळे, शिवाली देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Swami Vivekanand honored with patriotic poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.