स्वामिनाथन आयोग व संपूर्ण कर्जमुक्तीचा नारा
By admin | Published: October 4, 2016 06:17 AM2016-10-04T06:17:46+5:302016-10-04T06:17:46+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने देशपांडे सभागृहात आयोजित दोन दिवसीय विदर्भाच्या प्रतिरूप
विदर्भाची प्रतिरूप विधानसभा : विरोधकांची आक्रमक भूमिका, सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने देशपांडे सभागृहात आयोजित दोन दिवसीय विदर्भाच्या प्रतिरूप विधानसभेला सोमवारपासून सुरुवात झाली. विधानसभेच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाने जोरदारपणे लावून धरली. यावरून सभागृहात गोंधळ उडाला. कृषिमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर येत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. संपूर्ण दिवसभरात सभागृहाचे कामकाज
दोनवेळा तहकूब करावे लागले.
सोमवारी दुपारी १२.४५ वाजता सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. राज्यपाल मधुकरराव निसर यांना मुख्य न्यायाधीशांनी शपथ दिली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष मोरेश्वर टेंबुर्डे यांनाही शपथ देण्यात आली. अध्यक्षांनी मुख्यमंत्री अॅड. वामनराव चटप यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ व आमदारांना शपथ दिली. सर्वप्रथम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुख्यमंत्री अॅड. चटप यांनी शोकप्रस्ताव सादर केला. सभागृहाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनाही श्रद्धांजली अर्पण केली. राज्यपालांचे अभिभाषणापर्यंत कामकाज सुरळीत चालले. प्रश्नोत्तराच्या तास सुरू झाला. उद्योग विभागाशी संबधित प्रश्न पुकारण्यात आला.
कृषी विभागाच्या संबधित प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले. स्वामिनाथन आयोग कधी लागू करता असा जाब विचारत संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करू लागले. विरोधकांचे आक्रमक रूप पाहून कृषिमंत्र्यानी त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, परंतु समाधान होऊ शकले नाही. विरोधकांनी सभात्याग केला.
दरम्यान विरोधी पक्षाच्या घोषणाबाजीत शासन शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. परंतु त्याने फारसा फरक पडला नाही.(प्रतिनिधी)