स्वरशिल्पचा सुखद 'सुहाना सफर'; ५५ कलाकारांची प्रस्तुती
By नरेश डोंगरे | Published: October 1, 2023 11:33 PM2023-10-01T23:33:45+5:302023-10-01T23:34:50+5:30
अविट गोडीच्या गीतांचा नजराणा, वादकांचीही सुरेल साथ.
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मेरी आवाजही पहेचान है...सारखी अनेक अविट गोडीची गाणी गात स्वरशिल्प म्यूझिक अकादमीच्या कलावंतांनी रविवारी सायंकाळी श्रोत्यांना गीत-संगीताची सुखद सफर घडविली.
परसिस्टन्सच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य अतिथी म्हणून समाजसेविका कांचनताई गडकरी तर, प्रमूख अतिथी म्हणून 'लोकमत'चे माजी संपादक कमलाकर धारप, माजी महापाैर संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. भाग्यश्री बारस्कर यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची शैली अनोखी होती. अकादमीच्या ५५ गायक, गायिकांनी वेगवेगळ्या धाटणीत एकल आणि समुहात गितांचे सादरीकरण केले. त्यात राज कपूर, देवानंद, राजेंद्रकुमार, मधुबालापासून तो राजेश खन्ना, अमिताभ, ऋषी कपूर, नितू सिंग, जिनत अमान, रेखा, राखी आणि कमल हसन, रती अग्निहोत्री, मिथून, पद्मीनी कोल्हापूरे, अनिल कपूर, मनीषा कोईराला तो आमिर खान आदीं कलावंतांच्या चित्रपटातील सुपर डूपर हिट गितांचा समावेश होता. 'ज्योती कलश छलके' ने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर कलावंतांनी 'लग जा गले, तेरे चेहरे से नजर नही हटती, नजारे हम क्या देखे, तेरे मेरे बिच मे.., तुमसे मिलकर ना जाने क्यू, तेरा मुझसे है पहले का नाता कोई, तू कितनी अच्छी है ओ... माँ..., पापा कहते है बडा नाम करेंगा, सांसो की जरूरत है जैसे... कुछ ना कहों...कुछ भी ना कहो अशी एकापेक्षा एक सुरेल गीते सादर करीत नव्या जुन्या पिढीतील श्रोत्यांना गीत-संगीताची सुहानी सफर घडविली.
कांचनताईंचे जगदंबेला साकडे
कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी कांचनताई गडकरी यांनीही श्रोत्यांसमोर जगदंबे आई जगदंबे सत्वर पावशील... म्हणत भक्तीगीतातून जगंदबेला साकडे घातले. आरजे अमोल शेंडे याने कार्यक्रमाचे खुमासदार सादरीकरण करून श्रोत्यांना बांधून ठेवले. तर, निवडक मात्र कसलेल्या वाद्य कलावंतांनीही गायकांना सुरेल साथसंगत करत कार्यक्रमाची उंची वाढविली.