स्वराज्यनिष्ठ ‘शिवपुत्र संभाजी’ यांचे जाज्वल्य दर्शन : महानाट्याने नागपूरकरांना दीपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:28 PM2018-12-22T23:28:15+5:302018-12-22T23:36:01+5:30
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत स्वराज्याचा सूर्य उदयाला आणला. त्यांच्यानंतर ही स्वराज्य पताका तेवत ठेवली ती स्वराज्यनिष्ठ महापराक्रमी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी. शंभूराजांची छळाने अल्पवयात हत्या करण्यात आली, मात्र या शिवबाच्या छाव्याने आपल्या अल्प आयुष्यात स्वकर्तृत्वाने मराठी मुलुखाचा अभिमान कायम राखला. अशा या देदीप्यमान इतिहासपुरुषाचे जाज्वल्य दर्शन ‘शिवपुत्र संभाजी’ या भव्यदिव्य महानाट्यातून नागपूरकरांना घडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत स्वराज्याचा सूर्य उदयाला आणला. त्यांच्यानंतर ही स्वराज्य पताका तेवत ठेवली ती स्वराज्यनिष्ठ महापराक्रमी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी. शंभूराजांची छळाने अल्पवयात हत्या करण्यात आली, मात्र या शिवबाच्या छाव्याने आपल्या अल्प आयुष्यात स्वकर्तृत्वाने मराठी मुलुखाचा अभिमान कायम राखला. अशा या देदीप्यमान इतिहासपुरुषाचे जाज्वल्य दर्शन ‘शिवपुत्र संभाजी’ या भव्यदिव्य महानाट्यातून नागपूरकरांना घडले.
माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने या रोमांचक अशा महानाट्याचे २२ ते २८ डिसेंबरपर्यंत सलग सात प्रयोग रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी आयोजित महानाट्याचा पहिलाच प्रयोग झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी तुळजाभवनीची आरती तसेच अश्व व गज (हत्ती) पूजनही करण्यात आले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एन. देशपांडे, माजी खासदार अजय संचेती, एसीसी सिमेंटचे प्रबंध संचालक नीरज अखौरी, पंकज बाबरिया, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आरएसएसचे अ.भा. सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक माजी आमदार मोहन मते आणि महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक व निर्माता शिवशंभूशाहीर महेंद्र महाडिक प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणेची निर्मिती असलेल्या या महानाट्याचा पहिलाच प्रयोग डोळे दीपविणारा ठरला. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या टीव्ही मालिकेतील कलावंत डॉ. अमोल कोल्हे यांनी या महानाट्यात प्रमुख पात्र साकारले आहे. महानाट्याला शोभेल अशा नेपथ्याच्या गरजेनुसार प्रतापगड, रायगड, पन्हाळगड आदी किल्ले तसेच औरंगजेबाचा दरबार असलेला १३० फुटांचा भव्य असा फिरता रंगमंच, २५० कलावंतांसह सहभाग, इतिहासाचा मागोवा घेणारी आकर्षक वेशभूषा, एकामागून एक घडणाऱ्या प्रसंगासह वेगवान कथानकामुळे हे महानाट्य प्रेक्षकांना खिळवून ठेवते. हत्ती, घोड्यांचा उत्तम सहभाग, गडकिल्ल्यावर घडणारे व युद्धाचे प्रसंग शिवराय व शंभूराजे यांच्या पराक्रमाचा इतिहास जिवंत करतात. पराक्रमाच्या गाथेसह शिवराय व शंभूराजे यांच्याविरोधात त्यांच्याच किल्ल्यात शिजणारी कावेबाजी, शंभूराजे यांचा करुण अंत अशी दृश्ये प्रेक्षकांना भावुक करतात. सुरुवातीला शिवरायांचा व नंतर शंभूराजेंचा घोड्यावरील धावता प्रवेश पाहणाºयांच्या अंगावर काटा उभा करतो.
शिवरायांची गाथा सांगणारा कलाप्रकार म्हणजे पोवाडा. शिवपुत्राची गाथा सांगण्यासाठी नाट्यासोबत सतत चालणाऱ्या पोवाड्याचा खुबीने उपयोग निर्मात्याने केला आहे. अशा सर्व अंगाने हे महानाट्य भव्यदिव्य स्वरूप धारण करते व प्रेक्षकांना एक अलौकिक आनंद प्रदान करते.
इतिहासकारांनी शंभूराजेंवर अन्याय केला : मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांचा पुत्र शोभावा असा पराक्रम शंभूराजांनी केला, मात्र इतिहासकारांनी त्यांच्यावर कायम अन्याय केल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. संभाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने औरंगजेबाची कबर केली. त्याला झुंजवत ठेवले व अखेरपर्यंत त्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. शंभूराजे देश आणि स्वराज्यासाठी संघर्ष करीत राहिले. दुर्दैवाने त्यांचा करुण अंत झाला. असे असले तरी त्यांचा अंतही हजारोंना प्रेरणा देणारा आहे. छत्रपतींच्या स्वराज्याचे रक्षण करीत लढायामागून लढाया जिंकत त्यांनी पराक्रम घडविला. ते लढवय्ये व विद्वानही होते. शंभूराजेंचे कर्तृत्व परिपूर्ण होते. त्यांचा इतिहास आता लोकांच्या समोर येत आहे व या महानाट्यातून नागपूरकर व वैदर्भीयांना तो जाणण्याची संधी उपलब्ध केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे पेशवाई पगडीने तर अन्य मान्यवरांचे मराठमोळी पगडी घालून स्वागत करण्यात आले. मध्यंतरादरम्यान किल्ले प्रदर्शनाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.