पुनर्वसित रानबाेडीत चाेरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:12 AM2021-09-06T04:12:10+5:302021-09-06T04:12:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : शहराला खेटूनच असलेल्या पुनर्वसित रानबोडी येथे चार ठिकाणी तर लगतच्याच शिवापूर शिवारात एका ठिकाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : शहराला खेटूनच असलेल्या पुनर्वसित रानबोडी येथे चार ठिकाणी तर लगतच्याच शिवापूर शिवारात एका ठिकाणी चोरट्यांनी शनिवारी (दि.४) मध्यरात्री चांगलाच धुमाकूळ घातला. एकाच रात्री पाच ठिकाणी कुलूप तोडले. यापैकी एका घरातून चाेरट्यांनी राेख रक्कम लंपास केली.
रानबोडी येथील विठोबा फुकट हे कुटुंबीयांसह मंदिरात भजनाला गेले होते. घरी कुणीही नसल्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातून राेख १४ हजार चाेरून नेले. लगतच्याच शंकर सहारे यांच्याकडे कुणीही नसल्याची संधी साधून चाेरट्याने त्यांच्याही घराचे कुलूप तोडले. घराशेजारी असलेल्या इंदूबाई फुकट यासुद्धा भजनासाठी गेल्या होत्या. त्यांच्याकडेही कुलूप तुटलेल्या अवस्थेत आणि साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते. मंजुळा फुकट यांच्या घराचेही कुलूप ताेडून चोरट्यांनी त्यांच्याकडील राेख रक्कम लंपास केली. दरम्यान प्रफुल फुकट यांच्याकडे दगडफेक आणि प्रेमदास गेडाम यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी बाहेरून लावण्याचा प्रकारही चोरट्यांनी केला. या संपूर्ण प्रकारानंतर रात्री पोलिसांनी गावकऱ्यांसह गस्त घातली. लगतच्या जंगल परिसरात चोरटे पसार झाले. यामुळे गावकरी भयभीत झाले असून वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. चोख पाेलीस बंदोबस्ताची मागणी केली जात आहे.