स्वरवेदचे ‘रेखा क्लासिक’ : देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:15 AM2018-12-02T00:15:23+5:302018-12-02T00:17:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हिंदी सिनेजगतातील स्वरूपवान आणि तेवढीच अभिनयसंपन्न अभिनेत्री म्हणजे रेखा. वर्षानुवर्षे सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदी सिनेजगतातील स्वरूपवान आणि तेवढीच अभिनयसंपन्न अभिनेत्री म्हणजे रेखा. वर्षानुवर्षे सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारी रेखा व तिच्या चाहत्यांचे हृदयस्पर्शी नाते आहे. किंबहुना आजच्या आघाडीच्या नायिकांपैकी एक अशी गणना होणाऱ्या दाक्षिणात्य रूपाच्या रेखाबद्दल आजच्या पिढीतील तरुणांनाही तेवढेच आकर्षण आहे. या तिच्या चाहत्यांना रेखा अभिनित चित्रपटातील गीतांचा श्रवणानंद देणाऱ्या ‘रेखा क्लासिक’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच सायंटिफिक सभागृहात करण्यात आले.
स्वरवेदतर्फे आयोजित या कार्यक्रमाची निर्मिती-संकल्पना प्रसिद्ध तबलावादक रवी सातफळे यांची होती. अथक परिश्रमाने कमनीय शरीरसौष्ठव, सक्षम अभिनय क्षमता प्राप्त करणारी व कायम चर्चेत राहणारी चित्रतारका म्हणजे रेखा. तिची सावळी सतेज कांती, रेखीव सौंदर्य व या वयातही आकर्षक व्यक्तिमत्त्व यामुळे घायाळ होणाऱ्या श्रोत्यांसाठी तिच्यावर चित्रित गीते म्हणजे अनोखा अनुभव. अनेक ख्यातनाम अभिनेत्यांची हिरॉईन असलेल्या रेखाचे सगळेच सिनेमे दर्शनीय आहेत. तरी महानायक अमिताभसोबतचा तिचा सर्वांगाने बहरलेला अभिनय, चंद्रज्योतीसारखे उत्कट प्रेम, रोमान्स हा कायम चर्चेचा, उत्सुकतेचा व कौतुकाचा विषय. तिच्यावर अशा चित्रित गीतांना श्रोत्यांनी मनापासून एन्जॉय केले. शर्मिला चरलवार, अश्विनी लुले, पद्मजा सिन्हा, प्रतीक्षा पट्टलवार, पूर्वा साल्पेकर, दीपाली सप्रे, फाल्गुनी कुर्झेकर, रचना महाजन, पल्लवी दामले, सीमा सोनुले या गायिका व युगलगीताचे गायक डॉ. अमोल कुळकर्णी, धीरज आटे, राकेश शर्मा, डॉ. संजय उत्तरवार यांनी समरसतेने वैविध्यपूर्ण गीतांचे सादरीकरण केले.
‘साचा तेरा नाम..., आज कल पाव जमीपर नही पडते मेरे..., परदेसियॉ ये सच है पिया..., फिर वही रात है..., सलामे इश्क मेरी जान..., तेरे बिना जीया जाये ना..., निला आसमा सो गया..., देखा एक ख्याब तो ये सिलसिले हुये..., ये कहां आ गये हम..., पिया बावरी...’ अशी काही श्रवणीय गीते गायक कलावंतांनी सादर केली. पवन मानवटकर, रवी सातफ ळे, प्रकाश चव्हाण, विनीत कांबळे, तुषार विघ्ने, आशिष सुपारे या वादक कलावंतांनी साथसंगत केली. निवेदन श्वेता शेलगावकर यांचे होते. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक बागुल, साहित्यिक उज्ज्वला अंधारे, मधुरिका गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते.