संघर्ष करणाऱ्या महिलांच्या पाठीशी स्वयंपूर्णा उभी राहणार : कांचन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:55 PM2020-01-04T22:55:53+5:302020-01-04T22:58:44+5:30
कष्ट आणि संघर्षाची तयारी ठेवा उद्योजिका आणि यशस्वी स्त्री म्हणून तुम्हाला बळ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन स्वयंपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक स्त्रीमध्ये उद्यमशील शक्ती आहे. स्वत:ला उद्योजिका म्हणून ती नक्कीच सिद्ध करू शकते, परंतु केवळ संधीची वाट बघते. स्वयंपूर्णा संस्थेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असून, तुम्ही कष्ट आणि संघर्षाची तयारी ठेवा उद्योजिका आणि यशस्वी स्त्री म्हणून तुम्हाला बळ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन स्वयंपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी केले.
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वयंपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने लक्ष्मीनगर येथील जेरिल लॉन्स येथे ‘स्वयंपूर्णा एक्स्पो २०२०’चे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर एमएसएमईचे निदेशक प्रशांत पार्लेवार, स्वयंपूर्णाच्या कार्यवाह विजया भुसारी आणि उद्योजिका विशाखा राव, राहुल मिश्रा, विजयश्री खानोरकर उपस्थित होते.
कांचन गडकरी पुढे म्हणाल्या, अनेक कुटुंबांना आर्थिक आधार देण्याकरिता संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबविले जातात. सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देण्याचेसुद्धा सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, सामाजिक प्रतिष्ठा महिलांना मिळाली पाहिजे आणि यासाठी ती उद्योजिका झाली पाहिजे त्यादृष्टीने समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी पुढे यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
प्रशांत पार्लेवार यांनी एमएसएमईच्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांना विशेष सुविधा शासनाकडे असून, यशस्वी महिलांना व दर्जेदार उत्पादनांना आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. या तीन दिवसीय प्रदर्शनात विविध योजनांची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार असून, कर्जविषयक माहितीही देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. विशाखा राव यांनी उद्योजक म्हणून त्यांचे अनुभव सांगितले. संचालन स्नेहल अलोणे यांनी केले. श्रुती बाईवार यांनी ध्येयगीत सादर केले. स्वयंपूर्णा संस्थेच्या नेहा लघाटे, नीलिमा बावणे, नीलिमा गढीकर, रेखा सप्तर्षी, रश्मी पोफळी,ज्योत्स्ना डहाके आदींनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.