कुही येथे सफाई कामगारांचे उपाेषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:43+5:302021-06-10T04:07:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : नगर पंचायत अंतर्गत असलेल्या सफाई कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत बुधवारपासून (दि.९) ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : नगर पंचायत अंतर्गत असलेल्या सफाई कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत बुधवारपासून (दि.९) उपाेषण सुरू केले आहे. शहराच्या स्वच्छतेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या सफाई कामगारांना गेल्या चार महिन्यापासून मजुरीपासून वंचित राहावे लागत आहे. या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी अखेर सफाई कामगारांनी आंदाेलन पुकारले आहे.
कुही नगर पंचायतीने शहराच्या स्वच्छतेसाठी नागपूर येथील व्ही. आर. ए. एन्टरप्रायजेसला कंत्राट दिले आहे. या कंत्राटदार कंपनीमार्फत मार्च २०१८ पासून ३२ महिला व १८ पुरुष सफाई कामगार कार्यरत हाेते. नियमित कामावर असताना कंत्राटदार कंपनीने २१ सफाई कामगारांना अचानक कामावरून कमी केले. शिवाय, गेल्या चार महिन्यापासून कामगारांना मजुरी दिली नाही.
सफाई कामगारांनी आपल्या न्याय्य मागण्या साेडविण्यासाठी कित्येकदा मागणी केली. परंतु आजपर्यंत एकही मागणी मंजूर केली नाही. कामगारांना त्यांची मजुरी बॅंकेतून देण्यात यावी. भविष्य निर्वाह निधी कपात करण्यात यावा. सर्व कामगारांना ४०००, ४५००, ५००० याप्रमाणे वेतन न देता सर्वांना एकमुस्त वेतन द्यावे, वेतन शासकीय नियमाप्रमाणे देण्यात यावे. व्यवस्थापक नलिनी वनवे या कामगारांना नेहमी त्रास देतात. कामगारांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्यांना पदावरून तात्काळ काढण्यात यावे. कामगार कामावर असतानाही त्याची गैरहजेरी लावली जाते. आदी मागण्यांकडे लक्ष वेधत कामगारांनी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय अतकरी यांच्या नेतृत्वात आंदाेलन पुकारले आहे. महिला व पुरुष कामगार एकत्रित येऊन नगर पंचायत कार्यालयासमाेर उपाेषणाला बसले आहेत.
सहायक कामगार आयुक्त नागपूर यांनी नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांना एप्रिल २०२१ ला पत्र देऊनही कामगारांच्या समस्यांबाबत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे कामगारांच्या प्रलंबित मागण्या व समस्या तातडीने साेडविण्याची मागणी कामगारांनी रेटून धरली आहे.