सणासुदीत साखरेचा गोडवा महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 09:48 PM2018-08-04T21:48:16+5:302018-08-04T21:49:58+5:30
यंदा उसाच्या भरघोस उत्पादनासह साखरेच्या उत्पादनातही प्रचंड वाढ झाली. त्यामुळे साखरेचे भाव निच्चतम स्तरावर पोहोचले. एप्रिलमध्ये ३० रुपये किलो विकण्यात येणारी साखर आता आॅगस्टमध्ये ४२ रुपयांवर पोहोचली आहे. तीन महिन्यात साखर १२ रुपयांनी महागली असून सणासुदीत साखरेचा गोडवा महागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा उसाच्या भरघोस उत्पादनासह साखरेच्या उत्पादनातही प्रचंड वाढ झाली. त्यामुळे साखरेचे भाव निच्चतम स्तरावर पोहोचले. एप्रिलमध्ये ३० रुपये किलो विकण्यात येणारी साखर आता आॅगस्टमध्ये ४२ रुपयांवर पोहोचली आहे. तीन महिन्यात साखर १२ रुपयांनी महागली असून सणासुदीत साखरेचा गोडवा महागला आहे.
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारचे धोरण
यावर्षी एप्रिल महिन्यात मीलमध्ये २५ रुपये आणि ठोकमध्ये २८ रुपयांत सारखेची विक्री झाली. साखर कारखान्यांनी केंद्र सरकारकडे साखर उद्योग वाचविण्याची मागणी केल्यानंतर सरकारने देऊ केलेल्या प्रोत्साहनपर राशीनंतर साखरेच्या किमती वाढल्या आणि कारखान्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर बाजारात सारखेचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिलमध्ये ३० रुपयांचे भाव एक महिन्यातच ३४ ते ३६ रुपयांवर पोहोचले.
ठोक साखर विक्रेते रामदास वजानी यांनी सांगितले की, उसाच्या भरघोस उत्पादनामुळे साखरेचे भाव फारच कमी झाले. त्यामुळे साखर कारखान्यांना तोटा झाला. महाराष्ट्रात २० हजार कोटी रुपयांचे चुकारे ऊस उत्पादकांचे थकीत झाले. एकीकडे साखरेचे कमी भाव तर दुसरीकडे उत्पादकांचे कोट्यवधींच्या थकीत रकमेमुळे कारखानदार दुहेरी पेचात सापडले. कारखाने टिकवून ठेवण्याासाठी त्यांनी थेट पंतप्रधान यांच्याकडे मदतीची मागणी केली. शेतकºयांना वाचविण्यासाठी सरकारने काही योजना आणल्या.
उत्पादन ३२२ लाख टन तर देशात विक्री २५५ लाख टन
सरकारने निर्यात खुली केली आणि आयात शुल्क माफ केले. निर्यातीत प्रति पोत्यावर (१०० किलो) ७०० रुपये प्रोत्साहनपर राशी देऊ केली. त्यामुळे कारखानदारांना थोडाफार दिलासा मिळाला. पण विदेशातही यावर्षी उसाचे बंपर उत्पादन झाल्यामुळे निर्यात नगण्य होती. त्यानंतरही यावर्षी निर्यात चार लाख टन होण्याची शक्यता आहे. सरकारने मिल मालकांना कोटा बांधून दिला. साखरेचे भाव २९ रुपये निर्धारित केले. त्यामुळे साखरेच्या भावात वाढ होऊ लागली. वजानी यांनी सांगितले की, देशात वार्षिक २५५ लाख टन विक्रीच्या तुलनेत यावर्षी देशात ३२२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. एवढी साखर विकायची कुठे, हा प्रश्न कारखानदारांसमोर उभा राहिला. पुरवठा आणि मागणीत प्रचंड तफावत आल्याने यावर्षी कारखानदारांना मोठा फटका बसला आहे.