चहावाल्यांच्या चहाचा गोडवा हरवला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:31 PM2020-04-21T22:31:18+5:302020-04-21T22:34:20+5:30
जुना बाबूलखेडा येथे राहणार शुभम चंदू कुंभारे. चार वर्षांपासून एनआयटी गार्डनजवळ चहा विकण्याचे काम करतो. याच भरवशावर म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी तो सांभाळत होता. कोरोना रोखण्यासाठी लागलेल्या ताळेबंदीत त्याचा रोजगारच हिरावला आहे. त्यामुळे आता कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुना बाबूलखेडा येथे राहणार शुभम चंदू कुंभारे. चार वर्षांपासून एनआयटी गार्डनजवळ चहा विकण्याचे काम करतो. याच भरवशावर म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी तो सांभाळत होता. कोरोना रोखण्यासाठी लागलेल्या ताळेबंदीत त्याचा रोजगारच हिरावला आहे. त्यामुळे आता कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
शुभम कुंभारे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. टाळेबंदीने लाखो कामगार आणि लहानमोठ्या व्यवसायिकांचा रोजगार गेला आहे आणि शहरातील शेकडो चहा विक्रेते हे त्यातीलच आहेत. शहरातील गलोगल्लीत कधी मोठ्या दुकानात तर कधी लहान लहान दुकाने लावून चहा विक्री केली जाते आणि यातून शेकडोंना रोजगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळाला आहे. शुभम फार जास्त शिकलेला नाही. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. वडील टेलर आहेत आणि महाल येथे एका मोठ्या दुकानात ते कामाला जात होते. अल्प शिक्षित असल्याने रोजगाराची चिंता त्याला आणि आईवडिलांनाही होती. त्यावेळी शुभमने एनआयटी गार्डनजवळ चहाचे दुकान थाटले. त्यामुळे कुटुंबाला आधार तर मिळालाच पण वडिलांनाही आराम मिळाला होता. शुभम सांगतो, रोज ७००-८०० रुपयांची विक्री व्हायची. चांगलं दुकान चालायचं. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी अतिक्रमणाची कारवाई झाली आणि महिनाभर दुकान बंद ठेवावे लागले. १० दिवसांपूर्वी त्याने पुन्हा दुकान सुरू केले होते पण आता पुन्हा कोरोनामुळे आलेल्या परिस्थितीने त्याचा रोजगार पुन्हा हिरावला गेला आहे. एका महिन्यापासून दुकान बंद आहे आणि आता कुटुंबासमोर संकट उ•ो झाले आहे. विशेष म्हणजे यात वडिलांचाही रोजगार बंद झाला आहे.
शुभमसारखे शेकडो चहा विक्रेते आहेत ज्यांच्यावर टाळेबंदीने संकट ओढवले आहे. काही अतिशय लहान विक्रेते थोड्याफार व्यवसायातून किडुकमिडुक जमा करून आपला प्रपंच भागवत होते. मात्र कोरोनाने त्या सर्वांना अडचणीत टाकले आहे. शहरात रस्त्यारस्त्यावर अशी चहाची अनेक दुकाने लागली होती, ती बंद झाली आहेत. घरी आवश्यक तेवढे पैसे नाहीत आणि अन्नधान्यही नाही. त्यामुळे कुटुंबाची गरज पूर्ण करण्याचा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
काही वळले दुसऱ्या व्यवसायाकडे
चहाटपरी बंद झाल्याने स्वत: शुभम एका टरबूज विक्रेत्याकडे काम करीत आहे. १००-१५० रोजी मिळाली तीच खूप आहे, असे तो म्हणतो. अनेक चहा विक्रेत्यांनी भाजीपाला विक्री किंवा फळे विक्रीचे काम सुरू केले आहे. घराचा प्रपंच चालविण्यासाठी काही पर्यायच नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे.