स्विमिंग टँकमध्ये बुडाली विद्यार्थिनी
By Admin | Published: September 11, 2015 03:20 AM2015-09-11T03:20:16+5:302015-09-11T03:20:16+5:30
मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह संशयास्पदरीत्या स्विमिंग टँकमध्ये आढळला.
बीटीपी फार्महाऊसमधील घटना : बर्थडे पार्टी भोवली
नागपूर : मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह संशयास्पदरीत्या स्विमिंग टँकमध्ये आढळला. कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोंडाखैरी शिवारातील बीपीपी फार्महाऊसमध्ये ही खळबळजनक घटना घडली. यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
फेटरी सिल्लोरी मार्गावर तोंडाखैरी शिवारात मजहर शेखचा हा फार्महाऊस आहे. येथे नागपूरच्या रामबाग कॉलनीत राहणाऱ्या शिवा सुभाष यादवची बर्थडे पार्टी होती. त्यासाठी ७ मुली आणि २१ मुले पार्टीसाठी पोहोचली. दुपारी १.३० वाजता पार्टी सुरू झाली. बहुतांश मुले-मुली दारूच्या नशेत झिंगू लागले.
नाचगाणे, धांगडधिंगा झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता जेवणासाठी एकमेकांना बोलावणे सुरू झाले. काही जण जेवणाच्या टेबलकडे गेले. यातील पूर्वा संजय हेडाऊ (वय १८) ही दिसत नसल्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. फार्महाऊसमधील सर्व रूम आणि कानाकोपरा शोधल्यानंतर आजूबाजूची झाडीझुडपातही तिला शोधण्यात आले. पूर्वा कुठेच दिसली नाही.
अनेकांची नशा उतरली
नागपूर : पूर्वाशी स्नेह जपणाऱ्या काही मित्रांनी स्विमिंग पूलमध्ये उतरून तिचा कानोसा घेतला. त्यानंतर सारेच हादरले. पूर्वाचा मृतदेह स्विमिंग टँकच्या तळाशी पडून होता. ते पाहून अनेकांची नशा उतरली. काहींनी आहे त्याच अवस्थेत तेथून पळ काढला तर, काहींनी पोलिसांना कळविले.
त्यानुसार कळमेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. पूर्वाच्या मृत्यूबाबत कुणीच काही बोलायला तयार नव्हते. त्यामुळे पूर्वाच्या मृत्यूने संशयकल्लोळ जास्तच वाढवला. पोलिसांनी पंचनामा करून विद्यार्थ्यांचे बयान नोंदविले. त्यानंतर पूर्वाचा मृतदेह रुग्णालयात रवाना करण्यात आला. (प्रतिनिधी)
आंटी कुठाय?
ही धक्कादायक घटना घडल्यानंतर या फार्महाऊसवर महत्त्वाची भूमिका वठविणारी आंटी गायब झाली. नागपूरच्या सिराज शेखचे हे फार्महाऊस असून, येथे नको ते प्रकार चालतात, अशी चर्चा आहे. ‘आंटी‘च सर्व सुविधा उपलब्ध करून देते, त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते, असे पंचक्रोशीतील नागरिक सांगतात. गुरुवारची पार्टीही आंटीनेच मॅनेज करून दिली होती. त्यात सहभागी ७ मुली आणि २१ तरुण अशा एकूण २८ जणांकडून प्रत्येकी ६५० रुपये घेण्यात आले होते, असे समजते.
सारेच संशयास्पद
मृत पूर्वा ही संताजी महाविद्यालयात बीएस्सी मायक्रोलॉजीच्या प्रथम वर्षाला शिकत होती, असे समजते. तिला या पार्टीत नेणाऱ्यांनी तिच्याकडे कसे दुर्लक्ष हा प्रश्न संशय वाढविणारा आहे. ती पाण्यात बुडून असेपर्यंत कुणालाच कसे दिसले नाही, तिला शोधताना काहींची भूमिका संशयास्पद होती, त्यांनी पूर्वाचा घात केला काय, बाजूच्या रूममध्ये पार्टीतील काही तरुणी आणि काही तरुण नको ते कृत्य करीत होते, त्यांना या प्रकाराची कशी चाहुल लागली नाही, असे अनेक प्रश्न चर्चेला आले असून, पूर्वाचा मृत्यू अपघाताने झाला की घातपाताने, त्याबाबतही उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.