शहरातील अनेक व्यापाऱ्यांची लाखोंची रोकड घेऊन ठगबाज शर्मा फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:07+5:302021-08-23T04:12:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेगा जॅक पॉट, लकी ड्रॉ आणि बीसीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून लाखोंची रोकड घेऊन ठगबाज मनीष ...

The swindler Sharma absconded with lakhs of cash from several traders in the city | शहरातील अनेक व्यापाऱ्यांची लाखोंची रोकड घेऊन ठगबाज शर्मा फरार

शहरातील अनेक व्यापाऱ्यांची लाखोंची रोकड घेऊन ठगबाज शर्मा फरार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेगा जॅक पॉट, लकी ड्रॉ आणि बीसीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून लाखोंची रोकड घेऊन ठगबाज मनीष किसनलाल शर्मा पळून गेला. त्यामुळे गांधीबाग, इतवारीतील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बागडे मोहल्ल्यात राहणाऱ्या आरोपी मनीष शर्माचे गांधीबागमध्ये अल्फा एनएक्स नावाने दुकान होते. त्याने तीन वर्षांपासून व्यापाऱ्यांशी बीसीच्या माध्यमातून ओळख वाढवली. प्रारंभी छोट्या रकमेची आणि नंतर मोठ्या रकमेची बीसी चालवून तो वर्षाला कोट्यवधींची उलाढाल करू लागला. नंतर त्याने एनएस मेगा जॅकपॉट, लकी ड्रॉच्या नावानेही वेगवेगळी थापेबाजी करून रक्कम जमविणे सुरू केेले. अशा प्रकारे कोट्यवधी रुपये गोळा केल्यानंतर त्याने गाशा गुंडाळायला सुरुवात केली. त्याचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने जून २०२१ पासून व्यापाऱ्यांनी त्याच्याकडे आपली रक्कम परत मागण्यासाठी तगादा लावला. आपली रक्कम परत मिळणार म्हणून आस लावून बसलेल्या अनेक व्यापाऱ्यांनी काही दलालांच्या माध्यमातून शर्मावर दबाव वाढवला. मात्र, आधीच पोबारा करण्याची तयारी करून बसलेल्या शर्माने स्वत:चे घर, दुकान कुलूपबंद करून येथून पलायन केले. त्यामुळे अखेर फसगत झालेल्या व्यापाऱ्यांपैकी रोहित सुरेश पुनियानी (वय ३५, रा. वर्धमाननगर) आणि त्यांचे बंधू अमित पुनियानी यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पुनियानी बंधूंच्या तक्रारीनुसार, त्यांनी २० मे २०१९ ते २२ जून २०२१ दरम्यान आरोपींकडे ६ लाख १२ हजार रुपये गुंतविले होते. पोलिसांनी प्रदीर्घ चाैकशी केल्यानंतर आरोपी शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

----

दलालांनी केली तोडी

ठगबाज शर्माने फसविलेल्यांमध्ये काळे धन असणाऱ्या काही जणांचा समावेश आहे. ते आपले काही बिघडवू शकत नाहीत. पोलिसांतही तक्रार करू शकत नाही, असा शर्माला विश्वास होता. त्यामुळे तो त्यांना जुमानत नव्हता. तर काही जणांनी शर्माकडून वसुली करण्यासाठी त्याला दलालांच्या माध्यमातून वेगवेगळी धमकी दिली होती. या दलालांनी काळे धन फसलेल्यांसोबतच शर्माकडूनही बदनामी तसेच पोलिसांच्या कारवाईचा धाक दाखवून लाखो रुपयांची तोडी केल्याचे वृत्त आहे.

-----

Web Title: The swindler Sharma absconded with lakhs of cash from several traders in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.