‘स्वाइन फ्लू’चा विळखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:50 AM2017-09-19T00:50:15+5:302017-09-19T00:50:59+5:30
अकोला : संपूर्ण राज्यभर धुमाकूळ घालणार्या स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराचे आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, त्यांच्यावर शहरातील दोन खासगी इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८५ वर पोहचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूने जिल्हय़ात मार्च महिन्यापासून आतापर्यंत २0 जणांचे बळी घेतले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

स्वाइन फ्लू हा आजार श्वसन यंत्रणेशी संबंधित असून, तो एच १ एन १ या अत्यंत घातक विषाणूंमुळे होतो. हवेच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे एका रुग्णापासून दुसर्याला या आजाराची लागण होते.
या विषाणूंचा प्रसार रुग्णांच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम, त्याच्या थुंकीमधून होतो. अकोल्यात यावर्षी मार्च महिन्यात स्वाइन फ्लूचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तेव्हापासून या आजाराने डोके वर काढले आहे.
गत दोन दिवसांपूर्वी शहरातील दोन खासगी इस्पितळांमध्ये एक महिला व दोन पुरुष, अशा तिघांना स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्यानंतर दाखल करण्यात आले. त्यांच्या स्वॉबचे नमुने पॉझिटीव्ह आले असून, त्यांच्यावर टॅमी फ्लू उपचार सुरू करण्यात आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८५ वर
मार्च ते सप्टेंबर २0१७ या कालावधीत १५0 संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ८५ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ६२ रुग्ण एक तर बरे झाले आहेत किंवा त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वाइन फ्लूचा प्रसार झपाट्याने होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.