स्वाईन फ्लूने चिमुकलीचा मृत्यू
By admin | Published: April 22, 2017 02:56 AM2017-04-22T02:56:01+5:302017-04-22T02:56:01+5:30
वाढत्या तापमानातही स्वाईन फ्लू रुग्ण व मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
मेडिकलमध्ये होते उपचार सुरू : वडिलांचा हलगर्जीपणाचा आरोप
नागपूर : वाढत्या तापमानातही स्वाईन फ्लू रुग्ण व मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परिणामी, सामान्यांमध्ये या आजाराला घेऊन दशहतीचे वातावरण निर्माण होत आहे. बुधवारी स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आलेल्या एक वर्षीय चिमुकलीचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाल्याने नागपूर विभागात मृत्यूची संख्या १४वर गेली आहे. मृताच्या वडिलाने उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला आहे. सावनेर येथील रहिवासी आराध्या बाबा प्रधान (१) असे मृताचे नाव आहे. आराध्याचे वडील बाबा प्रधान यांनी ‘लोकमत’ला सांगितले, आराध्याचा ताप फार वाढल्याने ६ एप्रिल रोजी मेडिकलच्या बालरोग विभागात भरती करण्यात आले. ताप कमी होत नसल्याने तिला १५ एप्रिल रोजी अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते.
प्रकृती सुधारत होती. याच दरम्यान तिच्या घशाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. १९ एप्रिल रोजी नमुन्याचा अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आला. प्रकृती पूर्णत: सुधारली नसताना अचानक गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास व्हेन्टिलेटर काढले व अतिदक्षता विभागातून स्वाईन फ्लूच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्ये घेऊन जाण्यास सांगितले. तिथे व्हेन्टिलेटर न लावता सामान्य आॅक्सिजनवर ठेवण्यात आले. शुक्रवारी पहाटे ३ वाजता अचानक प्रकृती खालवली. त्यावेळी एकही वरिष्ठ डॉक्टर वॉर्डात नव्हता. शिकाऊ डॉक्टर होते. वॉर्डाच्या सामोर अतिदक्षता विभाग असताना तिथे मुलीला नेले नाही. व्हेन्टिलेटरही लावले नाही. यातच सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या या हलगर्जीपणाचा तक्रार मेडिकलच्या अधिष्ठात्यांकडे करणार आहे, असेही प्रधान म्हणाले. (प्रतिनिधी)