स्वाईन फ्लू वाढतोय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:22 AM2017-08-31T01:22:01+5:302017-08-31T01:22:42+5:30
उपराजधानीत पावसाचा जोर वाढताच स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सोमवारी सहा रुग्ण पॉझिटीव्ह आले असून दोन महिलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत पावसाचा जोर वाढताच स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सोमवारी सहा रुग्ण पॉझिटीव्ह आले असून दोन महिलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गणेशोत्सवावर स्वाईन फ्लूच्या सावटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुंदा उमाठे (४६) व निर्मला गणवीर (३६) असे मृत महिलांचे नाव आहे.
विघ्नहर्त्याच्या आगमनाने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना स्वाईन फ्लूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे. सोमवारी पॉझिटीव्ह आलेल्या सहा रुग्णांमध्ये दोन पुरुष तर चार महिलांचा समावेश आहे. सध्या या सर्वांवर खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, २३ आॅगस्ट रोजी कुंदा उमाठे तर सोमवारी निर्मला गणवीर यांच्या झालेल्या मृत्यूने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्या-त्या वसाहतींमध्ये आवश्यक उपाययोजनांवर भर देत आहे.
पाच वर्षाची चिमुकलीही पॉझिटीव्ह
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीचाही स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह आला आहे. तूर्तास तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.
२३ रुग्णांचा मृत्यू
स्वाईन फ्लूची दहशत कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. नागपूर विभागात १४७ रुग्ण आढळून आले असून मृताची नोंद ३८ वर गेली आहे. उपराजधानीत आतापर्यंत स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या १०९ वर पोहचली आहे तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.