कोरोना तुलनेत स्वाइन फ्लू अधिक धोकादायक; रुग्णांची संख्या २११
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 09:21 PM2022-08-18T21:21:54+5:302022-08-18T21:22:35+5:30
Nagpur News कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला असलातरी स्वाइन फ्लूच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवली आहे.
नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला असलातरी स्वाइन फ्लूच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवली आहे. आज झालेल्या स्वाइन फ्लूच्या ‘डेथ ऑडिट’मध्ये आणखी ५ मृत्यूची भर पडली. मृत्यूची संख्या १० झाली असून नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २११ वर पोहचली आहे.
स्वाइन फ्लूची ओळख २००९ मध्ये झाली. त्या वर्षी नागपूर विभागात ४५ रुग्णांचे बळी गेल्याने खळबळ उडाली. २०१५ मध्ये सर्वाधिक ७९० रुग्ण व १७९ रुग्णांचे जीव गेले. २०१९ मध्ये ३६१ रुग्ण व ३९ मृत्यूची नोंद असताना २०२० मध्ये एकाही मृत्यूची नोंद नव्हती. परंतु आता पुन्हा ‘एच १ एन १’ विषाणूमुळे पसरणारा स्वाइन फ्लूचा धोका वाढताना दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे ५ मृत्यू असताना स्वाइन फ्लूच्या मृत्यूची संख्या १०, म्हणजे ५० टक्क्याने वाढली आहे.
-शहरात ६ तर, ग्रामीणमध्ये ५ मृत्यू
उपसंचालक आरोग्य विभागांतर्गत स्वाइन फ्लू मृत्यू लेखापरीक्षण समितीची (डेथ ऑडिट) बैठक गुरुवारी पार पडली. स्वाइन फ्लू संशयित ८ मृत्यूचे परीक्षण करण्यात आले. त्यातील ५ मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे पुढे आले. शहरात मृत्यूची संख्या ६, ग्रामीणमध्ये ४ असे एकूण १० झाली आहे.
-शहरात १२९, ग्रामीणमध्ये ८२ रुग्ण
जानेवारी ते १८ ऑगस्ट या दरम्यान शहरात १२९ तर, ग्रामीणमध्ये ८२ असे एकूण २११ रुग्णांची नोंद झाली. सध्या शहरातील ४२ व ग्रामीणमधील ५७ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहेत. शहर व ग्रामीण मिळून ९९ रुग्ण बरे झाले. सध्या ४ रुग्ण गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत.
-कोरोना रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूचा धोका
मनपाचे नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, स्वाइन फ्लूच्या मृतांमध्ये मागील दोन वर्षांत कोरोनामुळे गंभीर झालेले व कोमॉर्बिडीटी असलेल्या रुग्णांचा समावेश अधिक असल्याचे गुरुवारी झालेल्या ‘डेथ ऑडिट’मधून पुढे आले आहे. यामुळे कोरोना झालेल्यांनी व इतरही गंभीर आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
-लक्षणे आढळताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या
गरोदर महिला, पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील वृद्ध, गंभीर कोरोना झालेल्या व कोमॉर्बिडीटी असलेल्या व्यक्ती, केमोथेरपी सुरू असलेल्या आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी स्वाइन फ्लूची लक्षणे आढळताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. ‘स्वाइन फ्लू’ला दूर ठेवण्यासाठी ‘एन ९५ मास्क’ वापरा, वारंवार हात स्वच्छ धुवा व गर्दीचे ठिकाणे टाळा.
-डॉ. गोवर्धन नवखरे, मनपा नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग)