नागपूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूने घेतला पाच रुग्णांचा बळी; ७५ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 11:45 AM2022-08-06T11:45:30+5:302022-08-06T11:59:47+5:30
‘कोरोना’पाठोपाठ आता ‘स्वाइन फ्लू’ची दहशत
नागपूर : एकीकडे कोरोनाचे संकट वाढत असताना स्वाइन फ्लूने डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूने ५ रुग्णांचा बळी घेतला आहे. रुग्णांची संख्या ७५ झाली असून यातील ४६ रुग्ण विविध रुग्णालयात भरती आहेत. दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे मनपा आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
उपसंचालक आरोग्य विभागांतर्गत स्वाइन फ्लूने मृत्यू लेखापरीक्षण समितीची बैठक गुरुवारी झाली. यात नागपूर शहरातील तीन तर, ग्रामीण भागातील एक व इतर जिल्ह्यातील एक अशा पाच रुग्णांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली. शहरातील मृतांमध्ये नेहरूनगर झोनमधील ६३ वर्षीय पुरुष, गांधीबाग झोनमधील ५८ वर्षीय महिला, तर धंतोली झोनमधील ४७ वर्षीय पुरुष, नागपूर ग्रामीणमधील बोरखेडीतील कहारगाव येथील ६१ वर्षीय पुरुष तर, चंद्रपूर येथील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
- २०१५ मध्ये सर्वाधिक मृत्यू
२००९मध्ये पहिल्यांदाच स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. यावर्षी नागपूर विभागातील नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्हा मिळून ४५ मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर २०१० मध्ये ५४, २०१५ मध्ये सर्वाधिक १७९, २०१६ मध्ये २, २०१७ मध्ये ११९, २०१८ मध्य ११ तर २०१९ मध्ये ३९ मृत्यू झाले. त्यानंतर पहिल्यांदाच यावर्षी ५ मृत्यूची नोंद झाली.
पाच दिवसांत ३५ रुग्ण
नागपूर जिल्ह्यात पाच दिवसांत स्वाइन फ्लूच्या ३५ रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत या आजाराचे ७५ रुग्ण आढळून आले. यातील ४५ रुग्ण शहरातील असून, २४ रुग्ण इतर भागातील आहेत. सध्या ४६ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत १९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
- अतिजोखमीच्या व्यक्तींनो लस घ्या
स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा संचालनालयाद्वारे नागपूरला ५ हजार ‘इन्फ्ल्युएंझा’ लस प्राप्त झालेल्या आहेत. ही लस सध्या अतिजोखमीच्या व्यक्तींना दिली जात आहे. यात दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहितील गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असलेले व्यक्ती, नमुने तपासणारे डॉक्टर, कर्मचारी, याशिवाय, रुग्णांची देखभाल व उपचारात सहभागी डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासह इतर आरोग्य कर्मचारी यांनाही लस दिली जात आहे, अशी माहिती साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली. अधिक माहितीकरिता ९१७५४१४३५५ या क्रमांकावर सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.