सणासुदीच्या तोंडावर स्वाइन फ्ल्यूने वाढवली चिंता; १५ मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 01:56 PM2022-08-31T13:56:16+5:302022-08-31T13:58:43+5:30
रुग्णांची संख्या झाली ३३७
नागपूर : सणासुदीच्या तोंडावर ‘स्वाइन फ्ल्यू’च्या मृत्यूने चिंता वाढवली आहे. मंगळवारी झालेल्या स्वाइन फ्ल्यू मृत्यू लेखापरीक्षण समितीच्या बैठकीत पुन्हा १५ मृत्यूची पुष्टी करण्यात आली. मृतांची संख्या आता २० झाली असून, यात नागपूर शहरातील ९ मृत्यू आहेत.
कोरोनाचे संकट कमी होत असताना स्वाइन फ्ल्यू रुग्णसंख्या वाढत आहे. उपसंचालक आरोग्य विभागांतर्गत ४ ऑगस्ट रोजी स्वाइन फ्ल्यू मृत्यू लेखापरीक्षण समितीची बैठक घेण्यात आली. स्वाइन फ्ल्यू संशयित मृत्यू झालेल्या ६ पैकी ५ मृत्यूची घोषणा करण्यात आली. यात नागपूर शहरातील ३, ग्रामीण भागातील १, तर इतर जिल्ह्यातील एक असे ५ मृत्यू होते. त्यानंतर तब्बल २६ दिवसांनंतर उपसंचालक आरोग्य विभागाने समितीची बैठक घेतली. यात १६ स्वाइन फ्ल्यू संशयित मृत्यूवर चर्चा करण्यात आली. त्यातील १५ मृत्यू स्वाइन फ्ल्यूने झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील ६ मृत्यू
आज पुष्टी झालेल्या १५ मृत्यूमध्ये शहरातील ४, तर ग्रामीण भागातील २ असे नागपूर जिल्ह्यातील ६ मृत्यू आहेत. मध्य प्रदेशातील ५ मृत्यू असून, त्यात छिंदवाडा येथील ४, तर शिवनी येथील १ मृत्यू आहे. उर्वरित ४ मृत्यूमध्ये भंडाऱ्यातील २, तर चंद्रपूर व यवतमाळमधील प्रत्येकी १ मृत्यू आहे. नागपूर शहरात मृत्यूची एकूण संख्या १० झाली आहे, तर नागपूर ग्रामीणसह इतर जिल्ह्यांतील मृत्यूची संख्या ८ वर पोहोचली आहे. हे सर्व मृत्यू नागपुरात झाल्याने त्यांची येथे नोंद घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
१५ रुग्ण व्हेंटिलेटरवर
नागपुरातील शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत स्वाइन फ्ल्यूचे ११५ रुग्ण भरती आहेत. यातील १५ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.