नागपुरातील महाविद्यालयांवर टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 10:42 AM2019-08-02T10:42:46+5:302019-08-02T10:44:50+5:30
नागपूर : शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालये बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण अकरावी प्रवेशासाठी सुरू केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या राऊंडनंतरही कॉलेजच्या ६५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालये बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण अकरावी प्रवेशासाठी सुरू केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या राऊंडनंतरही कॉलेजच्या ६५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. गुरुवारी तिसऱ्या राऊंडसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यानुसार जागांचे आवंटन करण्यात आले आहे.
शहरातील विविध महाविद्यालयात कला, वाणिज्य, एमसीव्हीसी आणि विज्ञान शाखेच्या ५८,२४० जागा आहेत. त्यापैकी २०,८२९ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या राऊंडमध्ये १४,७१७ जागा भरल्या गेल्या होत्या तर दुसऱ्या टप्प्यात ३,८१० जागांवर प्रवेश पूर्ण झाले. बायफोकलच्या २,३०३ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहे. यानुसार अद्याप ३७,४११ जागा रिक्त राहिल्या आहेत. गुरुवारी तिसऱ्या राऊंडसाठी जागा निर्धारित करण्यात आल्या. शिक्षण विभागाला मात्र रिक्त जागांचा ग्राफ कमी होण्याचा विश्वास आहे. सध्या बोर्डाची दहावीची पूरक परीक्षा सुरू आहे. त्यामुळे पूरक परीक्षेच्या निकालानंतर ८० ते ८५ टक्के जागा भरल्या जाण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शिक्षण विभाग दावा करीत असला तरी महाविद्यालयांना मात्र या दाव्यावर विश्वास नाही. कॉलेजच्या शिक्षकानुसार पूरक परीक्षेमध्ये नागपूर शहरातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प आहे. दुसरी बाब म्हणजे बहुतांश विद्यार्थी विभागाच्या दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे पूरक परीक्षेचे निकाल आल्यानंतरही या स्थिती सुधारेल, अशी शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे चौथ्या राऊंडनंतर शिक्षण विभागाने महाविद्यालयांना जागा भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाविद्यालयांनी केली आहे.
नावाजलेल्या कॉलेजच्या जागाही रिक्त
सूत्राच्या माहितीनुसार, शहरातील टॉप टेनमध्ये येणाऱ्या नावाजलेल्या कॉलेजमध्येही कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसीच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. तिसऱ्या राऊंडमध्येही या महाविद्यालयांना विद्यार्थी मिळाले नाही. त्यामुळे त्यांनाही चौथ्या राऊंडची वाट पाहावी लागणार आहे.