नागपुरात ‘सिम्बॉयसिस’चे प्रवेश जून २०१९ पासून; विद्या येरवडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:20 PM2018-01-22T12:20:30+5:302018-01-22T12:22:19+5:30

आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातीप्राप्त ‘सिम्बॉयसिस’ विद्यापीठाच्या नागपूर शाखेचे प्रवेश जून २०१९ पासून सुरू होणार आहेत.

'Symbiosis' admissions in Nagpur from June 2019; Vidya Yeravdekar | नागपुरात ‘सिम्बॉयसिस’चे प्रवेश जून २०१९ पासून; विद्या येरवडेकर

नागपुरात ‘सिम्बॉयसिस’चे प्रवेश जून २०१९ पासून; विद्या येरवडेकर

Next
ठळक मुद्दे ‘ग्रीन कॅम्पस’वर भरपहिल्या टप्प्यात चार अभ्यासक्रमांची सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातीप्राप्त ‘सिम्बॉयसिस’ विद्यापीठाच्या नागपूर शाखेचे प्रवेश जून २०१९ पासून सुरू होणार आहेत. येथील इमारत ही आंतरराष्ट्रीय पातळीची असावी, असा आमचा प्रयत्न राहणार असून ‘ग्रीन कॅम्पस’वर आमचा भर राहणार असल्याची माहिती ‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ.विद्या येरवडेकर यांनी दिली. ‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठ इमारतीच्या पायाभरणी समारंभाच्या अगोदर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
‘सिम्बॉयसिस’ नागपुरात यावे ही आमची इच्छा होती व नितीन गडकरी, आ.कृष्णा खोपडे तसेच येथील प्रशासनाने पूर्ण सहकार्य केले. ७२ एकर जागेपैकी २६ एकरमध्ये पहिल्या टप्प्यात आम्ही बांधकाम करणार आहोत. सुरुवातीला आम्ही ‘बिझनेस मॅनेजमेन्ट’, विधी, ‘डिझाईन प्लॅनिंग’ आणि ‘आर्किटेक्चर’ हे अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. सोबतच येथे कौशल्य विकास केंद्रदेखील स्थापन करण्यात येईल. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र इमारत असेल. नागपुरातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशामध्ये २५ टक्के आरक्षण असेल तर येथील विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये १५ टक्क्यांची सूट देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
येथील ‘कॅम्पस’ हा ‘इको-फ्रेंडली’ असावा असा आमचा मानस आहे व ‘ग्रीन कॅम्पस’ करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत. नागपूरच्या ‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, क्रीडा संकुल, ‘कन्व्हेन्शन सेंटर’, केंद्रीय वाचनालय यांचीदेखील उभारणी करण्यात येणार आहे, असेदेखील डॉ.येरवडेकर यांनी सांगितले.

राज्य शासन करणार सहकार्य : बावनकुळे
‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठात ‘ग्रीन कॅम्पस’ तयार करण्यात राज्य शासनदेखील सहकार्य करेल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. येथे विजेसाठी सौर प्रणाली वापरण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने शासनाला सादर करावा. २५ टक्के अनुदान शासनातर्फे देण्यात येईल. सौरऊर्जेमुळे विद्यापीठाला विजेच्या बिलांसाठी एकही पैसा खर्च करावा लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Web Title: 'Symbiosis' admissions in Nagpur from June 2019; Vidya Yeravdekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.