दीक्षाभूमी पुरोगामी चळवळीचे प्रतीक
By admin | Published: August 29, 2015 03:16 AM2015-08-29T03:16:30+5:302015-08-29T03:16:30+5:30
दीक्षाभूमी हे जागतिक कीर्तीचे स्मारक असून त्याचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे. जगभरात मानवतेचा संदेश देणारे स्मारक म्हणून दीक्षाभूमी ओळखली जाते.
‘अ’ श्रेणीचा दर्जा मिळावा : ‘लोक’लढ्याला संघटनांचे बळ
दीक्षाभूमी हे जागतिक कीर्तीचे स्मारक असून त्याचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे. जगभरात मानवतेचा संदेश देणारे स्मारक म्हणून दीक्षाभूमी ओळखली जाते. असे असताना राज्य शासनाने दीक्षाभूमीला पर्यटन स्थळ म्हणून ‘ब’ श्रेणी घोषित केली आहे. त्यामुळे दीक्षाभूमीचे महत्त्व लक्षात घेता दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा प्राप्त व्हावा. यासाठी लोकमतने पुढाकार घेत दीक्षाभूमीच्या सन्मानासाठी या शिर्षकांतर्गत लढा सुरू केला आहे. त्याला आंबेडकरी संघटनांसह विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक संघटनांनी लोकमतच्या या उपक्रमाबद्दल लोकमतचे अभिनंदन केले आहे.
ऊर्जा देणारी दीक्षाभूमी बहुजनांचेही प्रेरणास्थान
१४ आॅक्टोबर १९५६ साली भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे ५ लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व सर्व दलित, पीडित, शोषित व वंचित असलेल्या घटकांना मुक्ती मिळवून संपूर्ण जगाला न्याय, समता, बंधूता व शांतीचा संदेश दिला. या पवित्र भूमीवर विशेष प्रसंगी आंबेडकरी अनुयायांची प्रचंड गर्दी असते. दररोज सुद्धा अनेक शाळा व महाविद्यालयांच्या सहलीनिमित्त विद्यार्थी दर्शन घेत असतात. ही गर्दी कोणत्याही अपेक्षेने येत नाही तर इथून ऊर्जा प्राप्त करून नव्या जोमाने समाजकार्य करीत असतात. ही पवित्र भूमी बहुजनांचे देखील प्रेरणास्थान आहे. या ठिकाणी आलेला अनुयायी नतमस्तक होऊन नवीन उद्दिष्ट साध्य करण्यास सज्ज होतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला पर्यटनाचा अ दर्जा देऊन शासनाने स्वत:चा सन्मान वाढवावा.
डॉ. सोहन चवरे- नरेंद्र धनविजय
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना
नागपूर : दीक्षाभूमी ही पुरोगामी चळवळीचे प्रतीक असून बहुजनंचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध असलेल्या दीक्षाभूमीला राज्य शासनाने ‘अ’ श्रेणीचाच दर्जा देणे गरजेचे आहे, अशी मागणी करीत यासाठी लोकमतने सुरू केलेल्या उपक्रमाचे अनेक संघटनांनी अभिनंदन केले आहे.