नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या हातात आले टॅबलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:34 AM2018-06-30T11:34:54+5:302018-06-30T11:36:40+5:30

शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतच आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅबलेट देण्यात आले आहे.

Tablet in the hands of Anganwadi supervisor in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या हातात आले टॅबलेट

नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या हातात आले टॅबलेट

googlenewsNext
ठळक मुद्देबालकांच्या आधार कार्डसाठी विभागाचा उपक्रम १२६ पर्यवेक्षिकांना टॅबचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधारकार्डशिवाय कुठलीही शासकीय योजना राबविण्यात येऊ नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. अंगणवाडीत लाभ घेणाऱ्या शून्य ते सहा वर्षे वयोगटाच्या बालकांचे तसेच ग्रामीण भागातील महिलांचे आजही आधारकार्ड नाही. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेली आधारकार्ड मोहीम शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतच आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅबलेट देण्यात आले आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना राबविण्यात येते. शासनाने आधार सक्ती केल्याने या योजनेंतर्गतचा लाभ बंद होऊ नये म्हणून बालकांची आधार नोंदणी आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्रांची कमतरता असल्याने लाभार्थी बालक, मातांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी १२६ पर्यवेक्षिकांना टॅबलेट देण्यात आले आहे. लवकरच अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या आधार नोंदणीला सुरुवात होणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी व संदर्भ सेवा पुरविण्यात येतात. या योजनेंतर्गतचा लाभ देताना बोगस लाभार्थी दाखविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगस लाभार्थीला चाप बसावा या दृष्टिकोनातून लाभार्थ्यांची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांची आधार नोंदणी झालेली आहे व त्यांचे आधारकार्ड योजनेशी जोडण्यात आले आहे. अंगणवाडीतील सर्व बालकांच्या आधार क्रमांकाची माहिती संकलित केली जात आहे. तसेच ज्यांनी आधार नोंदणी केली नाही किंवा ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही अशा बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम पर्यवेक्षिकांना देण्यात आले आहे. या टॅबमध्ये आधार नोंदणी अ‍ॅपही डाऊनलोड केले आहे. त्यांना आधारकार्ड काढण्याचे प्रशिक्षण दिले आहे. शासनाकडून आधार नोंदणी आयडी येताच शहर व ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये नोंदणीला प्रारंभ होणार आहे.

ग्रामीण भागात ४० टक्के महिला आधारविना
अंगणवाडीतून बालकांबरोबरच किशोरवयीन मुली व स्तनदा मातांना सुद्धा लाभ देण्यात येतो. महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आले की, ४० टक्के युवती, महिलांजवळ अजूनही आधारकार्ड नाही. ग्रामीण भागात आधार नोंदणी केंद्र अत्यल्प असल्याने, शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे आधार कार्डच नाही. त्यामुळे आधार नोंदणीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो आहे.
- भागवत तांबे, महिला व बालविकास अधिकारी, जि.प.

Web Title: Tablet in the hands of Anganwadi supervisor in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.