दर आठवड्यात भरणार गुरुजींचीच शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 07:31 PM2020-09-29T19:31:45+5:302020-09-29T19:34:42+5:30
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचीच आता दर आठवड्याला ऑनलाईन शाळा भरणार आहे. तसे आदेशच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी काढले आहेत. पण अनेक शिक्षकांची सेवा कोरोना निर्मूलनासाठी अधिग्रहित केली आहे. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचीच आता दर आठवड्याला ऑनलाईन शाळा भरणार आहे. तसे आदेशच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी काढले आहेत. पण अनेक शिक्षकांची सेवा कोरोना निर्मूलनासाठी अधिग्रहित केली आहे. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू आहे हे दर्शविण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या अध्ययन अध्यापन कार्याचा साप्ताहिक अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबतचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेकडून देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत राज्यात शाळा बंद असल्या तरी विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, ज्या विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधने उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन व शिक्षक मित्र उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण देणे सुरू ठेवले आहे. शिक्षक करत असलेल्या या प्रयत्नांची, उपक्रमांची माहिती राज्य शासनास, केंद्र शासनास व इतर राज्यांना व्हावी याकरिता शिक्षण परिषदेने दिलेल्या लिंकवर शिक्षकांनी आपण केलेल्या कार्याची माहिती भरायची आहे.
ऐकावे तरी कुणाचे?
एकीकडे अनेक शिक्षकांच्या सेवा कोरोना साथरोग उपाययोजना मोहिमेकरिता संलग्न करण्यात आलेल्या आहेत. या कामातून जिल्हा प्रशासनाने शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही. दुसरीकडे शिक्षण विभागाकडून नवनवीन उपक्रम राबविण्याबाबत नित्य नव्या सूचना सातत्याने दिल्या जात आहेत. नेमके ऐकावे तरी कुणाचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
शिक्षकांना कार्यमुक्त करावे
कोरोनाच्या संदर्भात निरंतर सर्वेक्षण, स्वस्त धान्य दुकान, विलगीकरण केंद्र, माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम या सर्व ठिकाणी शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. शिक्षण विभागाचे निर्देश व शिक्षणाधिकारी यांच्या विनंतीनंतरही स्थानिक जिल्हा प्रशासन शिक्षकांना कार्यमुक्त करायला तयार नाही. तेव्हा एकाचवेळी शिक्षकांनी दोन्हींकडील कामे कशी करायची, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.