अवैध पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीसह तडीपार गुंडाला अटक
By योगेश पांडे | Published: May 31, 2024 06:59 PM2024-05-31T18:59:17+5:302024-05-31T18:59:39+5:30
Nagpur : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध पिस्तुल बाळगणाऱ्या एका आरोपीसह आणखी एका तडीपार गुंडालादेखील अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी या कारवाया केल्या.
शुक्रवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथक गस्तीवर असताना आमीर शेख बशीर शेख (३२, मिनीमाता नगर, गोधनी रोड) हा पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून देशी बनावटीचे पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरोधात मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाईदेखील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच झाली. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पथक गस्तीवर असताना न्यू मानकापूर येथील लीलाकुंज येथे एक तडीपार गुंड फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे पोहोचल्यावर तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याने त्याचे नाव तबस्सुर उर्फ तस्सु वसीम अहमद (२८, ताजनगर, मानकापूर) असे सांगितले. त्याचा रेकॉर्ड तपासला असता त्याला २७ ऑगस्ट रोजी गुन्हेगारी कारवायांसाठी जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याची बाब समोर आली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.